लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवर नागरिकांमध्ये असंतोष पसरल्यानंतर तेल कंपन्यांनी सलग १८ दिवसात पेट्रोलच्या किमतीत २.०४ रुपये तर डिझेलच्या किमतीत १.५५ रुपयांची कपात केली.प्राप्त माहितीनुसार, २८ मेच्या मध्यरात्री तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या किमतीत १ पैशांची कपात केल्यानंतर नागरिकांनी दरकपातीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. २९ मे रोजी पेट्रोलची प्रति लिटर किंमत ८६.७४ रुपये होती. त्यानंतर ३० मे रोजी त्यात ३ पैशांची घट झाली. ३१ मे रोजी किंमत स्थिर होती. १ जूनला २१ पैशांची कपात करण्यात आली. २ जूनला पेट्रोलमध्ये १० पैशांची घट करून पेट्रोल ८६.४४ रुपयांवर स्थिरावले. ३ जूनच्या मध्यरात्री १५ पैशांची कपात, ४ जूनला १३ पैशांची घट, ५ जूनला ११ पैसे घट तर ६ जूनच्या मध्यरात्री ९ पैशांची कपात करण्यात आली. तर ७ जून रोजी पेट्रोलचे प्रति लिटर भाव ८५.९६ रुपये होते. पेट्रोल भाव कपातीचा क्रम ८ जून रोजी दिसून आला. या दिवशी भावात १९ पैशांची कपात होऊन भाव ८५.३६ रुपयांवर स्थिरावले. ९ जूनला २४ पैशांची घट, १० जूनला २० पैसे आणि ११ जूनला १५ पैशांची घट होऊन पेट्रोलचे भाव ८४.७७ रुपयांपर्यंत घसरले.१२ आणि १३ जून या दोन्ही दिवशी पेट्रोलचे भाव स्थिर होते. १४ जूनला पेट्रोलमध्ये केवळ ८ पैशांची घट झाली. त्यामुळे ग्राहकांना शुक्रवारी पेट्रोल प्रति लिटर ८४.६९ रुपये तर डिझेल ७२.८० रुपयांत उपलब्ध होईल. केंद्राने अबकारी कर आणि राज्य शासनाने व्हॅटमध्ये कपात करून पेट्रोल स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी आहे.
नागपुरात १८ दिवसात पेट्रोलमध्ये २.०४ रुपयांची कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 1:09 AM
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवर नागरिकांमध्ये असंतोष पसरल्यानंतर तेल कंपन्यांनी सलग १८ दिवसात पेट्रोलच्या किमतीत २.०४ रुपये तर डिझेलच्या किमतीत १.५५ रुपयांची कपात केली.
ठळक मुद्दे पेट्रोलचे भाव ८४.६९ रुपये : डिझेलमध्ये १.५५ रुपयांची घट