लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संकटकाळात जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढतच आहेत. त्यात पेट्रोल आणि डिझेलची भर पडत आहे. निवडणुकांच्या काळात जवळपास २५ दिवस स्थिर असलेले पेट्रोल व डिझेलचे भाव ६ मेपासून दररोज वाढत आहेत. सात दिवसात पेट्रोल २.२० रुपयांनी महाग झाले असून, मंगळवारी ९८ रुपये, तर डिझेल ८८.०३ रुपये विकले गेले. अशा दरवाढीने पेट्रोल लवकरच शंभरी गाठणार आहे. पॉवर पेट्रोलचे दर प्रतिलिटर १०१.४३ रुपये आहेत.
५ मे रोजी पेट्रोल ९६.८० रुपये, तर डिझेलचे दर ८६.५३ रुपये होते. ११ मे रोजी पेट्रोल ९८ रुपये आणि डिझेल ८८.०३ रुपयांवर पोहोचले. दोन्ही इंधनाच्या दरात ६ मे, ७ मे, ८ मे, १० मे आणि ११ मे रोजी दररोज २० ते ३० पैशांची वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय दरानुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर दरदिवशी कमी-जास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम कंपन्यांना कोट्यवधी रुपयांचा फायदा होत असतानाही दररोज दरवाढ करून सामान्यांवर भार टाकत असल्याचा ग्राहक संघटनांचा आरोप आहे. यात केंद्र सरकारने मध्यस्थी करून दर स्थिर करावेत, अशी मागणी आहे. डिझेलच्या दरवाढीने कोरोनाकाळात मालवाहतूक महाग झाली आहे. त्यामुळेच जीवनाश्यक वस्तू महाग झाल्याचा आरोप होत आहे.