लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्याचा फायदा देशांतर्गत ग्राहकांना मिळाला नाही. तब्बल ६० दिवसानंतर पेट्रोल १६ पैसे आणि ३८ दिवसानंतर डिझेल २३ पैशांनी महाग होऊन भाव अनुक्रमे प्रति लिटर ८८.४५ रुपये आणि डिझेल ७७.६७ रुपयांवर पोहोचले आहेत. पुढे भाव कमी होण्याची शक्यता नसल्याने अनेकांचा कमी किंमत असलेल्या एलपीजी व सीएनजी किटकडे ओढा वाढल्याचे दिसून येत आहे.
कोरोना काळात वाहतुकीवर प्रतिबंध असल्याने आणि वर्क फ्रॉम होमचे कल्चर आल्याने पेट्रोल आणि डिझेलची विक्री २० टक्क्यांपर्यंत कमी झाली होती. त्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे दर दररोज बदलविण्यावर प्रतिबंध लावला होता. शिवाय कोरोना काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाची किंमत कमी झाल्याचा फायदा वाहनचालकांना मिळाली नाही. पण आता शाळा आणि कॉलेज वगळता नागपुरात सर्व बाजारपेठा आणि कार्यालये खुली झाली आहेत. त्यामुळे लोकांची ये-जा आणि वाहतूक वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलची विक्री पूर्वीच्या तुलनेत वाढली आहे.
प्राप्त आकडेवारीनुसार गुरुवार, १९ नोव्हेंबरपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली नाही. पण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल वाढताच गुरुवारी मध्यरात्रीनंतर कंपन्यांनी इंधनाच्या किमती वाढविल्या. शुक्रवार, २० नोव्हेंबरला पेेट्रोल प्रति लिटर ८८.४५, डिझेल ७७.६७ रुपये विकल्या गेले. पूर्वीच्या आकडेवारीनुसार १९ सप्टेंबरला पेट्रोलचे दर ८८.३७ रुपये होते. तर २१ सप्टेंबरला ८ पैशांची घसरण होऊन ८८.२९ रुपयांवर स्थिरावले. त्यानंतर २० नोव्हेंबरला पेट्रोल १६ पैशांनी तर डिझेल २३ पैशांनी वाढले आहे.
पेट्रोल आणि डिझेल दर तक्ता
तारीख पेट्रोल डिझेल
१९ सप्टें. ८८.३७ ७८.६२
२१ सप्टें. ८८.२९ ७८.३३
२७ सप्टें. ८८.२९ ७७.७२
२८ सप्टें. ८८.२९ ७७.६४
१३ ऑक्टो. ८८.२९ ७७.४४
२० नाेव्हें. ८८.४५ ७७.६७