नागपूर : कंटेनरच्या टँकमध्ये डिझेल भरणे सुरू असताना डिझेलने पेट घेतला अणि भडका उडाला. या आगीत दाेन मशीन तसेच कंटेनर व ट्रकचे टायर पूर्णपणे जळाले. कर्मचाऱ्यांसह ग्राहकांनी वेळीच पळ काढल्याने जीवित हानी झाली नाही. ही घटना बुटीबाेरी (ता. नागपूर ग्रामीण) शहरात शुक्रवारी (दि. २) रात्री ७.३० ते ७.४५ वाजताच्या सुमारास घडली.
कृष्णा इंगळे यांचा बुटीबाेरी शहरातील नागपूर-वर्धा मार्गावरील लाेकमत प्रेसजवळ इंडियन ऑइल कंपनीचा पेट्राेल व डिझेल पंप आहे. सुरुवातीच्या डिझेल मशीनमधून एचआर-३८/एक्स-३०९७ क्रमांकाच्या कंटेनरच्या टँकमध्ये डिझेल भरणे सुरू असताना डिझेलने अचानक पेट घेतला. ही बाब लक्षात कर्मचाऱ्यांसह पेट्राेल भरायला आलेल्या काही ग्राहकांनी तिथून लगेच पळ काढला. ही आग पसरत गेल्याने डिझेलच्या दाेन मशीन कंटेनर आणि एनएल-०१/एबी-६९१७ क्रमांकाच्या ट्रकची मागची चाके जळाली. यात नेमके किती रुपयांचे नुकसान झाले, ते कळू शकले नाही.
कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, फारसे यश न आल्याने बुटीबाेरी एमआयडीसीच्या दाेन तसेच बुटीबाेरी नगरपालिका व इंडाेरामा कंपनीच्या प्रत्येकी अशा एकूण चार अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. घटनेच्या वेळी पाच कर्मचारी व काही ग्राहक पेट्राेल पंपच्या आवारात उभे हाेते. अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्री ९ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविले हाेते. उपविभागीय पाेलिस अधिकारी पूजा गायकवाड व ठाणेदार भीमाजी पाटील घटनास्थळी उशिरापर्यंत हजर हाेते.
अग्निशमन दलाचे जवान जखमी
या आगीमुळे कंटेनरच्या आत असलेल्या पेपर शिटने पेट घेतला हाेता. आग विझविण्यासाठी एमआयडीसी अग्निशमन दलाचा जवान अजित निकम यांनी कंटेनरचा लाॅक उघडला आणि भडका उडाल्याने अजित निकम यांचा चेहरा व हात तसेच आगी विझविताना शंकर चांदेकर यांचे हात भाजल्याने दाेघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी लगेच नागपूरला रवाना करण्यात आले.
टायर फुटल्याने तारांबळ
या पेट्राेल पंपच्या आवारात तीन पेट्राेल, दाेन डिझेलच्या स्वतंत्र आणि डिझेल व पेट्राेलची संयुक्त अशा एकूण सहा मशीन आहेत. यातील डिझेलच्या दाेन मशीन जळाल्या. जमिनीच्या आत असलेल्या डिझेल व पेट्राेल टँक तसेच अन्य मशीन आगीपासून सुरक्षित राहिल्या. आगीमुळे कंटेनर व ट्रकचे मागच्या टायर फुटले. त्यांच्या आवाजामुळे परिसरात तारांबळ उडाली हाेती.