लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मौदा तालुक्यातील वडोदा येथील पेट्रोलपंपवर सहा तरुणांनी दरोडा टाकून २७,४०० रुपये पळविले. दरोडेखोरांनी पेट्रोलपंपावरील तिघांना जबर मारहाणही केली. ही घटना मंगळवारी (दि. २२) मध्यरात्रीनंतर २.४० वाजताच्या सुमारास घडली. या दरोड्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.चंद्रशेखर हेमराज मेश्राम (२७, रा. वॉर्ड क्र. ५, वडोदा, ता. कामठी) असे फिर्यादीचे नाव आहे. तो एक दिवसाआड याप्रमाणे रिलिव्हर सुपरवायजर म्हणून वडोदा येथील रिलायन्सच्या पेट्रोलपंपवर काम करतो. मंगळवारी रात्री तो आणि त्याच्यासह शैलेंद्र मनीराम बोंबर्डे, मदन हरीणखेडे हे दोन सेल्समन पेट्रोलपंपवर कार्यरत होते. चंद्रशेखर मेश्राम हा सेल्समनकडील पेट्रोल - डिझेल विक्रीचे २१,४०० रुपये लॉकर रुमकडे घेऊन जात होता. तेवढ्यात पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी पेट्रोलपंपवर आली. त्यात सहाजण तोंडावर रुमाल बांधून आलेले होते. त्यातील पाच जणांनी काळसर जॅकेट घातलेले होते. ते थेट सुपरवायजर सेल्स रुममध्ये आले आणि शिवीगाळ करू लागले. तेवढ्यात सुपरवायजर हा नाईट शिफ्टमधील पैसे लॉकरमध्ये टाकत असताना एका आरोपीने सुपरवायजरच्या मांडीवर लोखंडी रॉडने मारले. त्याच्याशी धक्काबुक्की करीत त्याच्या हातातील २१,४०० रुपये हिसकावले. त्यानंतर सुपरवायजरसोबत असलेल्या शैलेंद्रच्या पायावर रॉड मारून त्याच्याकडून चार हजार रुपये तर मदनकडून दोन हजार असे २७ हजार रुपये घेऊन पसार झाले. विशेष म्हणजे त्यांच्या बोलेरो गाडीवर नंबर प्लेट नव्हती, असे फिर्यादी सुपरवायजर सांगत आहे.
दराडेखोर हिंदी भाषिकया प्रकरणी मौदा पोलिसांना सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३९५, ३९७, ४५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद मडामे करीत आहे. याच प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे यांच्या नेतृत्वातील पथक करीत आहे. आरोपींपैकी एक आरोपी हा मराठीत तर उर्वरित पाचजण हिंदीत संभाषण करीत होते, असेही फिर्यादीने पोलिसांना सांगितले. या प्रकरणात लवकरच आरोपींपर्यंत पोहोचू, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.