लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेट्रोल जीवनावश्यक वस्तूंच्या श्रेणीत असल्याने नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप दररोज सुरू राहणार असल्याची माहिती विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी लोकमतशी बोलताना दिली. पेट्रोल पंप नियमित सुरू राहणार असून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे. पंप बंद राहणार असल्याच्या अफवांमुळे लोकांनी पेट्रोल भरण्यासाठी रात्री शहरातील विविध पंपांवर एकच गर्दी केली होती.कोरोना विषाणूचा होणारा संसर्ग पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी सर्व बीअर शॉपी, वाईन शॉप, परमिट रूम बार अॅण्ड रेस्टॉरंट, सर्व क्लब, देशी दारूची दुकाने, सर्व रेस्टॉरंट, पानठेले ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश बुधवार सायंकाळी ५ वाजेपासून लागू झाले आहेत. पण जिल्ह्यातील पेट्रोल पंप, किराणा दुकाने, दूध व भाजी दुकाने आणि आवश्यक सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत. पेट्रोल पंप सुरू राहण्यासंदर्भात सर्व पेट्रोल पंप संचालकांना फलक लावण्याच्या सूचना स्थानिक पोलीस ठाण्यामार्फत करण्यात आल्या असून, त्याबाबत विशेष सिस्टिमद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्वीच शाळा, महाविद्यालये, मॉल, जीम ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. पण बुधवारी अफवांमुळे शहरातील ईश्वरनगर, जट्टेवार सभागृह, नंदनवन, गुरुदेवनगर, ग्रेट नाग रोड, मेडिकल चौक, बसवेश्वर पुतळा, वर्धा रोड, सीताबर्डी याशिवाय सर्वच पंपांवर वाहनचालकांची गर्दी दिसून आली.काही पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या. पंप बंद ठेवण्याचे कोणतेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले नाहीत. पेट्रोल आवश्यक सेवेंतर्गत असल्याने बंद राहणार नाहीत, याची वाहनचालकांनी नोंद घ्यावी, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.अमित गुप्ता,अध्यक्ष, विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे
पेट्रोल पंप दररोज सुरू राहणार : अफवांनी उसळली रात्री गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 10:54 PM
पंप बंद राहणार असल्याच्या अफवांमुळे लोकांनी पेट्रोल भरण्यासाठी रात्री शहरातील विविध पंपांवर एकच गर्दी केली होती.
ठळक मुद्दे जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्पष्ट