लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर वधारल्याने देशांतर्गत पेट्रोलच्या दरात दरदिवशी वाढ होत आहे. तेल कंपन्या दररोज प्रति लिटरमागे १० ते २० पैसे वाढवीत असल्यामुळे ग्राहकांना खिशावर फारसा ताण येत नसल्याचे जाणवत नाही. पण कंपन्यांनी छुप्या मार्गाने गेल्या २० दिवसांत तब्बल २ रुपये १३ पैशांची वाढ केली आहे. मंगळवारी पेट्रोलचे दर ८०.८५ रुपये होते.प्राप्त माहितीनुसार, ५ नोव्हेंबरला पेट्रोलचे दर ७८.७२ रुपये होते. तेव्हापासून दर सतत वाढत आहेत. ९ नोव्हेंबरला दर ७८.९६ रुपये, १० रोजी ७९.१६, ११ रोजी ७९.३१, १५ रोजी ७९.७४, १६ रोजी ७९.८७ रुपये, १९ रोजी ८०.१९, २२ रोजी ८०.४५, २४ रोजी ८०.६४ रुपये, २५ रोजी ८०.७६ आणि मंगळवार २६ रोजी दर ८०.८५ रुपये होते. पेट्रोलचे दर लवकरच ८१ रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.यावर्षी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात इंधनावर २ रुपये अधिभार आकारल्यानंतर नागपुरात पेट्रोल २.६२ आणि डिझेल २.५० रुपयांनी महाग झाले होते. अनावश्यक कर आकारणीवर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. त्यापूर्वीही आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याचा फायदा ग्राहकांना न देता केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क आकारातून कोट्यवधींचा महसूल मिळविला होता. सरकारने इंधनाला जीएसटीच्या टप्प्यात आणून पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करावेत आणि ग्राहकांना फायदा द्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
उपराजधानीत पेट्रोल २० दिवसात २.१३ रुपयांनी महाग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 12:25 PM