खापरीतून स्थलांतरित होणार आयओसी व एचपीसीएलचे पेट्रोल डेपो : विदर्भाला मिळणार अकोला व चंद्रपूर डेपोतून पेट्रोल नागपूर : पेट्रोलियम मंत्रालय आणि विस्फोटक विभागाच्या आदेशानुसार हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (एचपीसीएल) आणि इंडियन आॅईल कॉर्पोरेशन लि. (आयओसीएल) या तेल कंपन्यांचे खापरी येथील पेट्रोल डेपो बोरखेडी येथे हलविण्यात येत आहेत. तरी या डेपोमधून कंपन्यांच्या अन्य उत्पादनांचे वितरण सुरू राहील. बोरखेडी येथे नवीन डेपो अडीच वर्षांत तयार होणार आहे. तोपर्यंत नागपूर शहराला बोरखेडी येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या डेपोमधून पेट्रोल मिळणार आहे. हिंगणा येथील औद्योगिक सेवा डेपोला पूर्वीच बोरखेडी येथून पेट्रोलचा पुरवठा सुरू केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. चार वर्षांपूर्वी जयपूर येथे तेल कंपन्यांच्या पेट्रोल डेपोमध्ये मोठा स्फोट होऊन आग लागली होती. तेव्हापासूनच देशात शहरात असलेले पेट्रोल डेपो शहराबाहेर नेण्यावर कंपनी स्तरावर चर्चा सुरू झाली होती. कदाचित त्याचाच एक भाग म्हणून खापरी येथील दोन्ही कंपन्यांचे डेपो शहराबाहेर नेण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. २ जानेवारीपासून पेट्रोलचा पुरवठा खापरी येथील पेट्रोल डेपो हलविण्याची प्रक्रिया मागील काही दिवसांपासून सुरू झाली आहे. २ जानेवारीपासून पेट्रोलचा संपूर्ण पुरवठा बोरखेडी डेपोतून होणार आहे आणि नागपूर ग्रामीण आणि लगतच्या काही जिल्ह्यांमध्ये दोन्ही तेल कंपन्यांच्या चंद्रपूर आणि अकोला येथील पेट्रोल डेपोमधून पुरवठा होणार आहे. आयओसीएलचे वरिष्ठ विभागीय व्यावस्थापक (रिटेल सेल) मनोज पाठक यांनी सांगितले की, आयओसीच्या खापरी येथील डेपोतून पेट्रोलचे वितरण नवीन वर्षात बंद होणार आहे. आता नागपूरवासीयांना बोरखेडी येथील बीपीसीएलच्या डेपोमधून पेट्रोल मिळणार आहे तर नागपूर शहराबाहेरील लोकांना चंद्रपूर आणि अकोला येथील डेपोतून पेट्रोल मिळेल. पण खापरी डेपोतून पेट्रोल वगळता अन्य उत्पादनांचे वितरण सुरू राहील.हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे डेपो व्यवस्थापक राजेंद्र दरणे, खापरी पेट्रोल डेपो बंद करण्याचा निर्णय कंपनीस्तरावर घेण्यात आला आहे. २ जानेवारीपासून बोरखेडी येथून पेट्रोल मिळेल. विदर्भात अकोला डेपोतून पेट्रोलचा पुरवठा करण्यात येणार आहे. अकोला येथून शहरात पेट्रोल आणण्यासाठी येणारा अतिरिक्त वाहन खर्च कंपनी उचलणार आहे. त्यामुळे ग्राहकांवर आर्थिक बोझा पडणार नाही. पेट्रोल डेपो शिफ्ट केल्यानंतर येथे देखभाल व दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे. (प्रतिनिधी) कुठून येते पेट्रोल मुंबई रिफायनरीतून पाईपलाईनद्वारे पेट्रोलियम उत्पादन मनमाडपर्यंत आणले जाते. मनमाड येथील रेल्वेद्वारे खापरी डेपोमध्ये सायडिंगच्या माध्यमातून आणण्यात येते. गरज पडल्यास गुजरात रिफायनरी येथून पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा करण्यात येतो. यामध्ये पेट्रोल, डिझेल, केरोसिन, विमानाचे इंधन, फर्नेस आॅईल आदींचा समावेश आहे. आयओटीएल बनविणार अद्ययावत डेपो आयओसीएल आणि जर्मनीच्या संयुक्त उपक्रम असलेली इंडियन आॅईल टॅन्किंग लिमिटेड (आयओटीएल) कंपनी बोरखेडी येथे आयओसीएल आणि एचपीसीएल या दोन्ही कंपन्यांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा डेपो तयार करणार आहे. हे डेपो साधारणत: अडीच वर्षांत उभे राहणार असल्याची शक्यता आहे. दोन्ही कंपन्यांचे डेपो तयार झाल्यानंतर पेट्रोलचे वितरण कंपन्यांचे अधिकारी करतील. पुढील काही वर्षांत खापरी येथील डेपो पूर्णत: बोरखेडी येथे स्थलांतरित होईल.
नागपुरात बोरखेडीतून मिळणार पेट्रोल
By admin | Published: January 01, 2017 2:46 AM