नागपूर : केंद्र सरकारने वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील (ईपीएफ) व्याजदरात वाढ करून ८.१५ टक्के दराने व्याज देण्याची घोषणा जुलै महिन्यात केली होती. परंतु दोन महिन्यानंतरही ईपीएफ खात्यात व्याजाची रक्कम टाकण्यात आलेली नाही. व्याजाच्या घोषणेवर अंमलबजावणी केव्हा होणार, असा प्रश्न नागपुरातील २० लाखांहून अधिक ईपीएफ सदस्य विचारत आहेत.
नागपुरात कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) १७ हजार प्रतिष्ठानांमध्ये कार्यरत २० लाखांहून अधिक सदस्यांना सेवा देते. ईपीएफओच्या वतीने २० लाख ९१ हजार ५५६ ईपीएफओ सदस्यांच्या खात्यात वित्तीय वर्ष २०२१-२२ च्या व्याजाची रक्कम टाकण्यात आली होती. एकूण १६,४८४ प्रतिष्ठानांच्या सदस्यांचा त्यावेळी समावेश होता. तर १५ प्रतिष्ठानांच्या कर्मचाऱ्यांच्या व्याजाची रक्कम तांत्रिक कारणांनी रोखण्यात आली होती. परंतु वित्तीय वर्ष २०२२-२३ मध्ये ईपीएफओ नागपूर अंतर्गत कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास २ लाख आणि प्रतिष्ठानांची संख्या जवळपास सव्वा हजारांनी वाढली आहे.
प्राप्त आकडेवारीनुसार, १,७१,७९ प्रतिष्ठानांच्या २२ लाख ६ हजार ३३ कर्मचाऱ्यांच्या खात्यात पीएफच्या व्याजाची रक्कम अजूनही टाकण्यात आलेली नाही. तसे पाहता ८.१५ टक्के दराने व्याज देण्याच्या घोषणेच्या दोन महिन्यानंतरही या कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम क्रेडिट करण्यात आलेली नाही. अखेर या लेटलतिफीचे कारण काय आणि व्याज देण्याच्या घोषणेवर सरकार केव्हा अंमलबजावणी करणार, अशी विचारणा कर्मचारी करीत आहेत.
व्याज क्रेडिट झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना एकमुश्त रक्कम दिसून येईल. व्याजाचे नुकसान होणार नाही. प्रक्रिया सुरू असून थोडी वाट बघावी, असा संदेश ईपीएफओतर्फे सोशल मीडियावर दिला जात आहे.