नरखेडः दुष्काळसदृश परिस्थिती तसेच ‘क्यार’ चक्रीवादळामुळे आलेल्या अवेळी पावसामुळे झालेल्या तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याच्या निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये प्रवेश घेणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील रामटेक, उमरेड, नागपूर ग्रामीण, कामठी, पारशिवनी, मौदा, काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर, भिवापूर आणि कुही तालुक्यातील विद्यार्थ्यांना उपरोक्त निर्णयाचा फायदा होईल. दहावी व बारावी परीक्षा, तंत्र शिक्षण परीक्षा मंडळ, व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, कला संचालनालय परीक्षा मंडळ, शासकीय परीक्षा मंडळाची डी.एड परीक्षा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृषी, कृषीतर
विद्यापीठाच्या परीक्षांसाठी ही सवलत असेल. ही सवलत मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयात अर्ज करताना अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या गावाचे रहिवासी असल्याचे तलाठी/ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र, तहसील कार्यालयाकडून काढलेले सत्र २०१८-१९ चे उत्पन्न प्रमाणपत्र, प्राचार्य यांचे विद्यार्थी सदर योजनेसाठी पात्र असल्याचे तसेच त्यांनी इतर शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज न केल्याचे प्रमाणपत्र, परीक्षा शुल्क भरल्याची पावती व पासबुकची झेराॅक्सप्रत सादर करावी.
या विद्यार्थ्यांना सवलत मिळणार नाही
ज्या विद्यार्थ्यांना शासनाच्या अन्य शैक्षणिक सवलतीनुसार १०० टक्के परीक्षा शुल्क माफीची सवलत उपलब्ध आहे. जे विद्यार्थी त्याच परीक्षेस दुसऱ्यांदा बसले असतील, जे विद्यार्थी बहिस्थ म्हणून नोंदले असतील. ज्या विद्यार्थ्यांचे पालक प्रत्यक्ष शहरात राहतात, नोकरी-धंदा करतात, परंतु त्यांच्या नावे गावी शेतजमीन आहे अशा विद्यार्थ्यांनी यापूर्वीच सदर योजनेचा लाभ घेतला आहे, ते ही सवलत घेऊ शकणार नाही.