नागपूर : भारतीय फार्मास्युटिकल क्षेत्राला जगभरात सन्मान असून भविष्यात याचा मोठा विस्तार होणार आहे. मात्र समोरील आव्हाने व संधी दोन्ही लक्षात घेता फार्मसी उद्योगांनी संशोधन व नाविन्यावर भर दिला पाहिजे. यातूनच निर्यातीमध्ये वाढ होईल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात शुक्रवारपासून ७१ व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसला सुरुवात झाली. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया डॉ. वेणूगोपाल सोमानी, इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशनचे अध्यक्ष डॉमिनिक जॉर्डन, ‘आयपीसी’च्या स्थानिक आयोजन समितीचे मुख्य संरक्षक जगन्नाथ शिंदे, ‘आयपीसी’चे अध्यक्ष डॉ.टी.व्ही.नारायण, एपीटीआयचे अध्यक्ष डॉ.मिलिंद उमेकर, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन प्रतिनिधी डॉ. जयंत चौधरी, भारत बायोटेक इंडियन फार्मा ग्रॅज्युएट्स असोसिएशनचे एमडी डॉ. कृष्णा एल्ला, आयपीसीचे संघटन सचिव अतुल मंडलेकर व सचिव प्रा. प्रकाश इटनकर, समन्वयक डॉ.चंद्रकांत डोईफोडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी, डॉ.प्रमोद खेडेकर प्रामुख्याने उपस्थित होते. भारतीय फार्मसी उद्योगाचा सातत्याने विस्तार होत आहे. या क्षेत्रात रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता आहे. फार्मसी क्षेत्राला इतर लोकांशी जोडण्यासाठी कृषी आधारित उत्पादनांचा वापर करण्याची गरज आहे, असेदेखील गडकरी म्हणाले. देशातील लॉजिस्टिकचा खर्च कमी होत आहे. प्रगत देशांत लॉजिस्टिकचा खर्च १० ते १२ टक्के आहे. भारतात तो आता १६ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे भविष्यात फार्मसी क्षेत्राला खूप संधी राहतील, असा विश्वासदेखील गडकरी यांनी व्यक्त केला. गडकरी यांच्या हस्ते प्रख्यात फार्मासिस्ट मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
सर्वांना परवडणारी औषधे बनावी
भारतीय उत्पादने जगातील सर्वाधिक परवडणारी आणि दर्जेदार उत्पादने आहेत. जेनेरिक औषधांबरोबरच नावीन्य ही काळाची गरज आहे. यामुळे उत्पादनखर्च कमी करून औषधे सर्वांना परवडणारी बनविण्यावर भर दिला पाहिजे, असे आवाहन डॉ.सोमानी यांनी केले.
गरिबांना औषधे मिळायला हवी
जगभरात काही देशांमध्ये गरजेपेक्षा जास्त औषधे उपलब्ध आहेत. मात्र, २ अब्ज लोकांना अद्यापही सहजपणे औषधे मिळू शकत नाही. या लोकांपर्यंत स्वस्त दरात औषधांचा पुरवठा झाला पाहिजे या दृष्टीने पावले उचचली पाहिजेत, असे प्रतिपादन डॉमिनिक जॉर्डन यांनी केले.