नागपूर विद्यापीठाच्या 'त्या' वादग्रस्त आदेशाला अंतरिम स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2022 11:54 AM2022-11-02T11:54:22+5:302022-11-02T12:00:00+5:30
१ डिसेंबरपर्यंत मागितले उत्तर
नागपूर : फार्मसी अभ्यासक्रमातील चार विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्यासंदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे जारी वादग्रस्त आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे, तसेच विद्यापीठाला नोटीस बजावून यावर येत्या १ डिसेंबरपर्यंत उत्तर मागितले आहे.
वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथील न्यू माॅन्टफोर्ट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीने ७५ टक्के हजेरी नसणे, दोन अंतर्गत परीक्षा न देणे, प्रकल्प व शोधप्रबंध सादर न करणे आणि दोन वर्षांचे शुल्क अदा न करणे या कारणांमुळे बी. फार्म. अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षामधील चार विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज स्वीकारले नाहीत. परिणामी, संबंधित विद्यार्थ्यांनी परीक्षा संपल्यानंतर म्हणजे, १८ जुलै रोजी विद्यापीठाकडे तक्रार केली.
विद्यापीठाच्या नोटीसनंतर इन्स्टिट्यूटने लेखी उत्तर सादर करून हे विद्यार्थी परीक्षेकरिता अपात्र असल्याचे कळविले. असे असताना विद्यापीठाने गेल्या २९ सप्टेंबर रोजी वादग्रस्त आदेश जारी करून विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज स्वीकारण्यास सांगितले व त्यांची विशेष परीक्षा घेण्याचे जाहीर केले. त्याविरुद्ध इन्स्टिट्यूटने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. इन्स्टिट्यूटतर्फे ॲड. भानुदास कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले.