नागपूर : कोरोनाच्या काळात खाजगी रुग्णालयांनी प्रसूतीसाठी दरवाजे बंद केले होते. त्यामुळे सरकारी रुग्णालये हे गर्भवतींसाठी खऱ्या अर्थाने आधार ठरले. ग्रामीण भागात कोरोनाच्या काळातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात ३५०३ प्रसूती झाल्या. ही संख्या दरवर्षीच्या तुलनेत बरीच मोठी असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
गेल्या एप्रिल २०२० ते जुलै २०२१ पर्यंत ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये तब्बल ३ हजार ५०३ महिलांच्या नॉर्मल व सिझरने यशस्वी प्रसूती पार पडल्या. यातील काही मातांना कोरोनाची बाधा झाली असताना त्यांना मेयो, मेडिकल येथे रेफर करून तिथे त्यांची यशस्वी प्रसूती पार पाडण्यात आली. कोरोनाच्या परिस्थितीत बहुतांशी खासगी रुग्णालयांनी बाधित मातांची प्रसूती करण्यास नकार दर्शविला होता. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील गर्भवती मातांकरिता पीएचसी व उपकेंद्रातील डॉक्टर व परिचारिका मदतीला धावून आले. जि.प.च्या अखत्यारित ५३ पीएचसी व ३१६ वर उपकेंद्र कार्यरत आहेत. कोरोनाच्या काळातही प्रसूत मातांवर योग्य उपचार करून त्यांची यशस्वी प्रसूती करण्याचे काम पीएचसी व उपकेंद्रातील डॉक्टर, परिचारिकांनी केले. त्यामुळेच एप्रिल २०२० ते मार्च २०२१ पर्यंत येथे तब्बल २७९९ यशस्वी प्रसूती तर एप्रिल २०२१ ते जुलै २०२१ पर्यंत ७०४ हून अधिक प्रसूती पार पडल्यात. बाधित गर्भवती मातांना प्रसूतीकरिता मेयो, मेडिकल येथे रेफर करून तिथे त्यांची यशस्वीरीत्या प्रसूती पार पडली.
- कोरोनाच्या काळात खऱ्या अर्थाने सरकारी यंत्रणांनी जनतेसाठी धावून कामे केलीत. खाजगी संस्थांनी त्या काळात आपली कामे थांबविली होती. त्यामुळे लोकांनाही सरकारी यंत्रणेशिवाय पर्याय नव्हता. केंद्रातील प्रसूती विभागाच्या आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हे शक्य झाले.
- डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी