नागपूर विद्यापीठ : नोंदणी शुल्कात १८५ टक्क्यांनी वाढयोगेश पांडे नागपूरराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांवर शुल्कवाढीचा ‘बॉम्ब’ टाकला आहे. ‘पीएचडी’च्या विविध शुल्कांमध्ये विद्यापीठाने प्रचंड वाढ केली आहे. अगदी ‘पीएचडी’च्या नोंदणी शुल्कात चक्क थोडी थोडकी नव्हे तर १८५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. या शुल्कवाढीमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.यासंदर्भात नागपूर विद्यापीठाने परिपत्रक जारी केले आहे. २३ डिसेंबर रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली व नव्या शुल्काला मान्यता देण्यात आली. हे परिपत्रक जारी झाल्यापासूनच हे शुल्क लागू होईल, असे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आतापर्यंत ‘पीएचडी’च्या नोंदणीसाठी ‘सिनॉप्सिस’ सादर करताना साडेतीनशे रुपये शुल्क भरावे लागायचे. आता १८५ टक्के अधिक म्हणजे चक्क १००० रुपये शुल्क भरणे अनिवार्य राहणार आहे. नोंदणी शुल्कात साडेसहाशे रुपयांची वाढ करण्यात आली आहे.याशिवाय ‘पीएचडी’साठी नोंदणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दर सहा महिन्यांनी ‘रिटेंशन’ शुल्क भरावे लागते. हे शुल्क २२५ रुपये इतके होते. परंतु आता हे शुल्क ५०० रुपये इतके करण्यात आले आहे. यात ११० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. संशोधन प्रबंध सादर करताना संशोधकांना अडीच हजार रुपयांचे शुल्क भरावे लागायचे. आता ते शुल्क आठ हजार रुपये झाले आहे. ही शुल्कवाढ ४ फेब्रुवारीपासूनच लागू झाली असल्याची माहिती प्रभारी वित्त व लेखा अधिकारी डॉ. अनिल हिरेखण यांनी दिली.संशोधन केंद्राच्या शुल्कात वाढ‘पीएचडी’च्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे विभाग किंवा मान्यताप्राप्त संशोधन केंद्रांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. याचे शुल्कदेखील वाढविण्यात आले आहे. हे शुल्क विद्याशाखेनुसार ४ हजार ते १० हजार रुपये करण्यात आले आहे. शिवाय प्रत्येक विद्यार्थ्याला ‘कोर्सवर्क’ करणे आवश्यक राहणार आहे. याचे शुल्क सात हजार रुपये करण्यात आले आहे. यातील दोन हजार रुपये विभाग किंवा महाविद्यालयकडून विद्यापीठाला देण्यात येतील. वाचनालयाचे शुल्कदेखील प्रतिवर्ष दोन हजार रुपये करण्यात आले आहे.
‘पीएचडी’ शुल्कवाढीचा दणका
By admin | Published: February 09, 2016 2:57 AM