लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने परत एकदा पीएच.डी.च्या संशोधकांना दिलासा दिला आहे. ज्यांना ठरलेल्या मुदतीत पीएच.डी.चे प्रबंध जमा करता आले नाहीत, त्यांना ते सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात विद्यापीठाने पत्रच जारी केले असून अशा उमेदवारांना ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत प्रबंध सादर करता येणार आहे.
‘कोरोना’चा संसर्ग परत एकदा वाढीस लागला असून अनेक पीएच.डी. संशोधकांना प्रबंध पूर्ण करण्यास अडचणी येत आहेत. अनेकांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. १७ मार्च रोजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली. विद्यापीठ अनुदान आयोगानेदेखील १६ मार्च रोजी सूचना जारी केली होती. त्यानुसार विद्यापीठाने निर्णय घेतला. ज्या पीएच.डी. संशोधकांना त्यांच्या मुदतीत प्रबंध जमा करता आलेले नाहीत किंवा ज्यांना जमा करता येणार नाही त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी स्पष्ट केले.
एमफिल तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये ‘डेझर्टेशन’ आवश्यक असते. अनेकांना तेदेखील सादर करता आलेले नाही. अशा विद्यार्थ्यांनादेखील मुदतवाढ देण्यात आली असून ते ३१ डिसेंबरपर्यंत ‘डेझर्टेशन’ सादर करू शकणार आहेत. संशोधकांना वाढीव परवानगीसाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडे अर्ज सादर करणे अनिवार्य असेल.