लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मनपाच्या झोन कार्यालयाकडून वा कंट्रोल रूमकडून संबंधित रुग्णांशी संपर्क साधून उपचारासंदर्भात विचारणा केली जाईल. मनपाच्या आरोग्य विभागातील कर्मचारी घरी येतील. औषध देतील अशी रुग्णांची अपेक्षा असते. परंतु अशी अपेक्षा करू नका, पॉझिटिव्ह रुग्णांची अशी विचारणा होत नाही, पण आजारातून बाहेर पडल्यानंतर महिनाभराने फोनवरून आपण कसे आहात ? अशी विचारणा होत असल्याने कोरोनामुक्त झालेल्यांना आर्श्चयाचा धक्का बसत आहे.
मनपातील एक माजी पदाधिकारी व त्यांचे कुटुंबीय पॉझिटिव्ह आले. परंतु मनपाच्या झोन कार्यालयातून वा कंट्रोल रूममधून साधी विचारणा झाली नाही. गृहविलगीकरणात त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेतले. तीन आठवड्यानंतर रिपोर्ट निगेटिव्ह आला. परंतु अशक्तपणा असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार सुरू आहे. महिना भरानंतर त्यांना कंट्रोल रूममधून फोन आला. प्रकृतीची विचारणा केली. आजारातून मुक्त झाल्यानंतर माजी पदाधिकाऱ्यांना विचारणा होत असेल तर इतरांचा विचारही न केलेला बरा.
नागपूर शहरात गृहविलगीकरणात ५० हजारांहून अधिक रुग्ण आहेत. यात गरीब, मोलमजुरी करणारेही आहेत. अशा लोकांना रुग्णालयात उपचार घेणे शक्य नाही. मनपाच्या आरोग्य विभागाकडून अशा रुग्णांची चौकशी करून औषध उपलब्ध केले तर आजारातून बरे होण्याला मदत होईल. सोबतच रुग्णांच्या मनातील भीती कमी होईल. परंतु कंट्रोल रूम वा झोन कार्यालयाकडून रुग्णांची साधी विचारपूसही केली जात नाही. अशा स्वरूपाच्या तक्रारी आहेत.
.......
पदाधिकारी उद्घाटन व कार्यक्रमात व्यस्त
मनपातील पदाधिकाऱ्यांचा कोरोना काळातही उद्घाटन व कार्यक्रमांचा मोह कमी झालेला नाही. सुविधा उपलब्ध करण्यापूर्वी कोविड केअर सेंटरची घोषणा करून पाहणी केली जाते. नंतर उद्घाटन करण्यात धन्यता मानण्याचे प्रकार सुरू आहे. कोरोना रुग्णांना वेळीच उपचार न मिळाल्याने लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याचा फटका अगामी निवडणुकीत बसू नये, यासाठी पदाधिकाऱ्यांचा हा आटापिटा सुरू असल्याची चर्चा आहे.
.....
पहिल्या लाटेत औषध वाटप
कोरोनाच्या पहिल्या लाटेत पॉझिटिव्ह रुग्णांची कंट्रोल रूमकडून विचारणा केली जात होती. आरोग्य कर्मचारी रुग्णांच्या घरी जाऊन औषध देत होते. पॉझिटिव्ह रुग्णाचे घर व परिसर सॅनिटाइज केला जात होता. परंतु दुसऱ्या लाटेत असा प्रकार बंद झाला. गृहविलगीकरणातील रुग्ण सध्या ‘रामभरोसे’ असल्याचे चित्र आहे.
...