लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातील दोन लाखाहून अधिक मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत नसल्याची बाब समोर आली आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हे मतदारांकडून फोटो गोळा करीत आहे. मतदार यादीत छायाचित्र नसणाऱ्या मतदारांनी १५ जुलैपर्यंत आपले फोटो मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे जमा करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यातील ४२ लाख ३० हजार ३८८ मतदारांपैकी २ लाख ४६ हजार ९२८ मतदारांचे छायाचित्र मतदार यादीमध्ये नाही. अनेक मतदार हे स्थलांतरित असल्याचे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. स्थलांतरित मतदारांच्या नावाची यादी संबंधित तालुक्यातील तसेच शहरातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात आली आहे. मतदार यादीतून नावे वगळण्यात आलेल्या मतदारांनी नागपूर डॉट एनआयसी डॉट इन या संकेतस्थळाला भेट देऊन, मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयात किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे जाऊन आपले नाव यादीत नाही याची खात्री करून घ्यावी, असे प्रशासनाने कळविले आहे.
त्या यादीमध्ये नाव असल्यास आपले छायाचित्र तात्काळ जमा करावे. १५ जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे छायाचित्र जमा न झाल्यास यादीतील मतदार हे स्थलांतरित आहे असे समजून त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येणार आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी कळविले आहे.