लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दैनंदिन जीवनात फोटोचे आणि पत्रकारितेत फोटोग्राफरचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कधी कधी सांगून, बोलून जे व्यक्त केले जाऊ शकत नाही, ते फोटोग्राफर एखाद्या फोटोमधून प्रभावीपणे व्यक्त करू शकतो, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले.जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून नागपूर प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने दिवंगत उदयराव वैतागे स्मृती पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. महाराजबाग जवळच्या साईश्रद्धा लॉनच्या सभागृहात सोमवारी दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम पार पडला. यात अध्यक्षस्थानावरून पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय बोलत होते. यावेळी मंचावर ज्येष्ठ छायाचित्रकार, सत्कारमूर्ती दत्ता हिवसे, बाबूराव चिंगलवार, जिल्हा माहिती अधिकारी केशव करंदीकर, नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे, वनराईचे उपाध्यक्ष अजय पाटील, देवेन दस्तुरे आणि चेतना टांक उपस्थित होत्या.प्रारंभी सर्वच पाहुण्यांनी आपल्या शुभेच्छापर संबोधनात राजकीय जीवनात फोटोचे महत्त्व विशद केले. तर, आपल्या छोटेखानी भाषणात पोलीस आयुक्तांनी माणसाच्या जीवनात फोटो किती महत्त्वाचा असतो, ते सांगताना स्वत:च्याच बाबतीतला एक मिश्किल किस्सा सांगून सभागृहात टाळ्यांचा पाऊस पाडला. डॉ. उपाध्याय म्हणाले, बिहारमध्ये लग्न जुळविण्यापूर्वी मुलामुलींचे फोटो एकदुसऱ्या पक्षाला पाठविण्यात येतात. ते पसंत पडल्यानंतर पुढच्या गोष्टी घडतात. लग्न जुळविण्यासाठी माझा फोटोही सासरच्या मंडळीकडे पाठविण्यात आला. तेव्हा कलर फोटोचे स्टुडिओ फारच कमी होते. त्यामुळे मी पाठविलेला ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटो पाहून लग्नास नकार मिळाला. एवढेच नव्हे तर फोटोत मुलगा (डॉ. उपाध्याय) वृद्ध असल्यासारखे दिसतात, अशी टिपणी मिळाली. लग्नास नकार मिळणे समजण्यासारखे होते. मात्र ऐन तारुण्यात वृद्ध असल्यासारखे दिसतो, असा शेरा मिळाल्यामुळे आपण खूपच अस्वस्थ झालो. आपण तडक जिल्ह्याच्या ठिकाणी गेलो आणि तेथील एका मोठ्या स्टुडिओत कलर फोटो काढून तो मुलींकडच्या मंडळींना पाठविला. तो फोटो बघितल्यावर तिकडून लग्नासाठी होकार मिळाला आणि आपले लग्न जुळले. विशिष्ट शैलीत मिश्किलपणे हा किस्सा ऐकवून पोलीस आयुक्तांनी फोटो अन् फोटोग्राफरची महती विशद केली, तेव्हा टाळ्यांचा पाऊस पडतानाच सभागृहात हास्याची कारंजीही उडाली.ज्येष्ठ छायाचित्रकार दत्ता हिवसे आणि बाबूराव चिंगलवार यांचा शाल, श्रीफळ आणि तुळशीचे रोपटे देऊन पोलीस आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून, ज्यांनी घडविले, शिकविले त्या गुरूंना मानवंदना देण्याचा आम्हा फोटोग्राफर्सचा प्रयत्न असल्याचे यावेळी ज्येष्ठ फोटोग्राफर अनंत मुळे यांनी प्रास्तविकातून सांगितले. कार्यक्रमाचे संचालन मुळे यांनी तर आभार प्रदर्शन राजेश टिकले यांनी केले.अनेकांचा सन्मान !दैनंदिन जीवनात फोटोग्राफर्सना मदत करणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेश सचिव अतुल कोटेचा, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर, वरिष्ठ निरीक्षक अतुल सबनीस, सीताबर्डीचे ठाणेदार जगवेंद्रसिंग राजपूत, पाचपावलीचे ठाणेदार अशोक मेश्राम, हवालदार सुनील इंगळे, पोलीस फोटोग्राफर बळीराम रेवतकर, राजीव जयस्वाल, धर्मेंद्र देशमुख, छायाचित्रकार वाटेकर यांनाही या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
पत्रकारितेत फोटोग्राफरचे अनन्यसाधारण महत्त्व : पोलीस आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 9:02 PM
पत्रकारितेत फोटोग्राफरचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कधी कधी सांगून, बोलून जे व्यक्त केले जाऊ शकत नाही, ते फोटोग्राफर एखाद्या फोटोमधून प्रभावीपणे व्यक्त करू शकतो, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले.
ठळक मुद्देउदयराव वैतागे स्मृती पुरस्कार समारंभ : ज्येष्ठ छायाचित्रकार दत्ता हिवसे, बाबूराव चिंगलवार यांचा सत्कार