नागपूर : गुडघ्याचा त्रास असल्यामुळे फिजिओथेरपीसाठी गेलेल्या आरोपीची फिजिओथेरपिस्ट असलेल्या युवतीशी ओळख झाली. त्यातूनच त्याने तिचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची घटना लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. लकडगंज पोलिसांनी आरोपी युवकास अटक केली आहे.
प्रशांत सत्यनारायण तिवारी (३३, सूर्यनगर, कळमना) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो खासगी काम करतो. आरोपी प्रशांत सप्टेंबर २०२२ मध्ये २५ वर्षीय पीडित फिजिओथेरपिस्ट युवती काम करीत असलेल्या रुग्णालयात उपचारासाठी आला होता. उपचारादरम्यान त्यांच्यात ओळख झाली. त्याने आपल्या नातेवाइकांनासुद्धा फिजिओथेरपी लावायची असल्याचे सांगून पीडित फिजिओथेरपिस्ट युवतीचा मोबाइल नंबर घेतला. त्यानंतर तो पीडित फिजिओथेरपिस्ट युवतीचा पाठलाग करू लागला. तिने ही माहिती आपले वडील आणि भावाला दिली. त्यानंतर ते आरोपी प्रशांतच्या घरी गेले. तेथे त्याच्या वडिलांना त्याचे कृत्य सांगितले असता आरोपीने माफी मागितली. परंतु शुक्रवारी पीडित फिजिओथेरपिस्ट युवती निकालस मंदिर रोडवर उभी असताना आरोपी प्रशांत तिच्याजवळ आला. त्याने तिचा हात पकडून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून लकडगंजच्या पोलिस उपनिरीक्षक दिशा पाटील यांनी आरोपी प्रशांतविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
..............