राजीव सिंह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भांडेवाडी कचरा डम्पिंग यार्डाला येत्या तीन वर्षात कचरामुक्त करण्याचा आराखडा महानगर पालिकेने आखला आहे. २२ हेक्टर जमिनीवर डम्प करण्यात आलेल्या १० लाख मे. टन कचऱ्यापैकी २ लाख मे. टन कचऱ्याची विल्हेवाट वर्षभरात लावण्यात आली. मात्र खेदाची बाब अशी की, जेवढ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली त्यापेक्षाही जास्त कचरा वर्षभरातच जमा झाला आहे. कचऱ्याची पुनर्प्रक्रिया (रिसायकलिंग) करण्याची सुविधा नसल्याने दररोज ५०० टन कचरा डम्प करावा लागतो. कचऱ्याची १०० टक्के विल्हेवाट लागत नसल्याने नागपूरला स्वच्छतेच्या रॅंकिंगमध्ये टॉप टेनमध्ये स्थान मिळणे कठीण दिसायला लागले आहे.
नागपूर शहरात दररोज १ हजार मेट्रिक टन कचरा संकलित होतो. यातील २०० मे.टन कचऱ्याच्या रिसायकलिंगची प्रक्रिया हंजर कंपनीकडून केली जाते. या कचऱ्यापासून खत आणि आरडीएफ तयार केले जाते. खताची विक्री आरसीएफलाच केली जाते. २०० टन ओल्या कचऱ्यावर रिसायकलिंग प्रक्रीया करून ४० दिवसात त्याचे खत तयार केले जाते. तर कचरा वेचणारी माणसे ५० टनांच्या जवळपास कोरडा कचरा उचलून नेतात. यातून त्यांना चांगली कमाई होते. नागपूर मनपाला ५०० टन कचरा डम्प केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
...कोरडा कचरा वेचण्यासाठी २८३ जणांना परवानगी
मनपाच्या भांडेवाडी यार्डमध्ये कोरडा कचरा वेचण्यासाठी २८३ कचरा वेचणाऱ्या व्यक्तींना मनपाच्या आरोग्य विभागाने अधिकृतपणे नेमले आहे. ते दररोज येऊन प्रक्रिया करता येण्यासारखा कचरा उचलतात. त्यांना यातून चांगली कमाई होते. त्यांच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष दिले जाते. ...
१०० टक्के कचरा उचलण्यासाठी प्रयत्न
मनपाचे उपायुक्त (घनकचरा) डॉ. प्रदीप दासरवार म्हणाले, कचरा प्रक्रियेची पद्धत अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरू आहेत. १०० टक्के कचरा उचलण्यासाठी एक योजना तयार केली आहे. त्याला मंजुरी मिळताच अंमलबजावणी केली जाईल.