मनिषा पांढरीपांडे यांचे पेंटिंग्ज प्रदर्शन : जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत आयोजन नागपूर : निसर्ग नेहमीच माणसाला खुणावतो आणि निसर्गाच्या विविध स्वरूपातून मानवी भावनांवरही परिणाम होतो. उंच पर्वतरांगात किंवा समुद्रकिनाऱ्यावर माणसाला त्याच्या खुजेपणाची जाणीव होते, गर्द वनराई, निळेशार शांत पाणी वेगळे आणि प्रवाहाचे पाणी वेगळे वाटते. निसर्गाच्या विविध रूपांचा मानवी भावनांशीही जवळचा संबंध आहे. ज्येष्ठ चित्रकार मनिषा पांढरीपांडे यांच्या निसर्गचित्रांचे प्रदर्शन रसिकांना खेचणारे आहे. निसर्ग आणि त्याचे सौंदर्य नेमकेपणाने टिपणारे तसेच मनाला प्रसन्नतेचा अनुभव देणारे हे प्रदर्शन आहे. जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी, लोकमत भवन येथे या प्रदर्शनाचे उद्घाटन विजयकुमार अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मनीषा पांढरीपांडे आणि कुटुंबीय प्रामुख्याने उपस्थित होते. विशेष म्हणजे यातील सर्व पेंटिंग्ज जलरंगाच्या माध्यमातून काढण्यात आली आहेत. पण जलरंगाचा उपयोग पांढरीपांडे यांनी मोठ्या कौशल्याने केला असल्याने ही चित्रे अॅक्रॅलिक माध्यमातून काढल्याचाच भास होतो. समुद्रकिनारा असो वा नदी, तलावाचा किनारा, मावळणारा सूर्य, उगवणारे फूल, गर्द वनराई, वनराईतून वाट काढत दूर जाणारा रस्ता हा साराच आशय चित्रातून एक भावना मांडणारा आहे. शालेय जीवनापासूनच चित्रकलेची आवड असणाऱ्या पण विधिवत अधिकृत शिक्षण न घेतलेल्या मनीषातार्इंनी त्यांचा अनुभव नेमकेपणाने चित्रात व्यक्त केला आहे. हे प्रदर्शन ३० आॅगस्टपर्यंत सर्व रसिकांसाठी रात्री ८ वाजेपर्यंत खुले आहे. याप्रसंगी प्रदर्शनाला ज्येष्ठ चित्रकार प्रमोदबाबू रामटेके, रघु नेवरे यांनी भेट दिली. त्यांनी या सर्व चित्रांची प्रशंसा करून मनीषातार्इंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)
चित्रातून निसर्गाचे सौंदर्य मांडणारे प्रदर्शन
By admin | Published: August 29, 2015 3:23 AM