दीनानाथ पडोळे यांच्या कलाकृती : जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत आयोजननागपूर : एक साधी रेषा...तसे पाहिले तर फारसा अर्थ नाही, असे वाटते. पण चित्रकाराच्या एका रेषेलाही फार अर्थ असतो. कुठलातरी अनाम संदर्भ घेऊन ही रेष रसिकांशी रिलेट होत असते. ती रेषा केवळ रेष नसते तर त्यात एक स्ट्रोक असतो, त्याची लय, उंची, जाडी बरीच बोलकी असते. या रेषेच्या आजूबाजूला असणारा कॅनव्हासचा अवकाशही मग बोलका होतो आणि रेषेला अर्थ प्राप्त होतो. या रेषांचे समूह जेव्हा एक आकार घेतात तेव्हा प्रत्येक रेषा एकमेकांमध्ये साधली जाते आणि रेषांचे अद्वैत एका चित्राकृतीला जन्म देते. चित्रकार दीनानाथ पडोळे यांच्या रेषा असे अनेक संदर्भ घेऊन वेगवेगळ्या आकारात आपल्याला भेटतात तेव्हा आपल्याच जीवनातला एखादा प्रसंग या रेषांमध्ये पेरून ठेवल्याचा भास रसिकांना होतो आणि रसिक त्यात स्वत:चा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. हेच दीनानाथजींच्या कलाकृतीचे यश म्हणावे लागेल. दीनानाथ पडोळे मित्र परिवाराच्यावतीने जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत त्यांच्या ‘अक्षयरेषा’ या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या देशावर अनेक आक्रमणे झालीत त्यात काही लयबद्ध मूर्त्यांची तोडफोड आक्रमकांनी केली. पण या मूर्तींची लय पाहणाऱ्यांच्या नजरेत असते. त्यामुळे ती मूर्ती कशी असेल याचा अंदाज रसिकांच्या डोळ्यात त्या मूर्तीच्या लयीने पूर्ण होतो. दीनानाथजींच्या रेषाही अनेक ठिकाणी लाक्षणिक अर्थाने संपल्या असल्या तरी त्या संपलेल्या नाहीत त्या अक्षय आहे. कॅनव्हासच्या पलिकडे या रेषा आमच्या जाणिवांना स्पर्श करून जातात. कधी या रेषांच्या समूहाने आपण आनंदित होतो तर कधी अस्वस्थ होतो. अनेकदा दीनानाथजींची ही चित्रे स्मरणरंजनात नेतात तर बरेचदा अस्वस्थ करताना विचारप्रवृत्त करतात. चित्रकाराला नेहमीच अमूर्ताचे आकर्षण वाटते आणि हे अमूर्त पकडण्याचा त्याचा प्रयत्न असतो. दीनानाथजींनी अमूर्ताचा हा शोध त्यांच्या कलाकृतीत घेतला आहे. पण अमूर्ताचा त्यांचा शोध अनेक चित्रातून त्यांनी मूर्ततेत आणताना रसिकांसाठी चित्राचा प्रवास अधिक सोपा करण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांची चित्रे अर्थबोधाच्या सीमारेषेवर रसिकांना आनंद देऊन जातात. राजकीय जीवन आणि त्यांच्यातला कलावंत म्हणून त्यांनी घेतलेला आयुष्याचा समृद्ध अनुभव, खंत, हुरहूर, समाधान, आनंद आणि हतबलताही त्यांनी चित्राकृतीतून सिद्धहस्ताने सांभाळल्या आहेत. हे प्रदर्शन रसिकांसाठी १४ मार्चपर्यंत सकाळी १०.३० ते रात्री ८.३० पर्यंत खुले आहे.(प्रतिनिधी)
रेषांमधून अर्थपूर्णता व्यक्त करणारे चित्रप्रदर्शन
By admin | Published: March 14, 2016 3:23 AM