लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आर्किटेक्ट किंवा गृहशिल्पी यांच्यामध्ये एक कलात्मक दृष्टिकोन असतो. त्या दृष्टिकोनाला केवळ शास्त्रीयतेची जोड असते. मात्र मोठमोठ्या इमारतींचे डिझाईन तयार करताना ही कलात्मकता महत्त्वाची ठरते. त्यामुळेच निर्माण होणाऱ्या वास्तुला सौंदर्यबोध येतो. गृहशिल्पींची हा कल्पक दृष्टिकोन कॅनव्हासवर रेखाटला गेला की त्यालाही सौंदर्याची झळाळी प्राप्त होते. लोकमत भवनच्या जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत सध्या सुरू असलेले चित्रप्रदर्शन गृहशिल्पींच्या याच कलात्मकतेचे दर्शन घडविण्यास पुरेसे आहे.श्रीकांत तनखीवाले यांच्या पुढाकाराने डिझाईनर्स अकॅडमीतर्फे दरवर्षीप्रमाणे यावेळीही आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या कलाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. जवळपास १०० गृहशिल्पी विद्यार्थ्यांनी या चित्रप्रदर्शनात सहभाग घेतला आहे. प्रसिद्ध कलावंत सपना हिरवानी यांच्याहस्ते दर्डा आर्ट गॅलरीत या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी कॅनव्हासवर रेखाटलेल्या पेंटिंग्ज, स्केचेस चित्रकलेच्या कलात्मकतेची शास्त्रीय मांडणी असल्याची जाणीव या प्रदर्शनातून होते. यामध्ये श्रीकांत तनखीवाले यांची जलरंगाची पाच चित्रही दर्शकांचे लक्ष वेधून घेतात. स्थापत्य शास्त्रातील विद्यार्थ्यांची वास्तुकलेत दिसणारी कलात्मकता कॅनव्हासवरून जगासमोर मांडणे, त्यांच्या चित्रकल्पकतेला प्रोत्साहन देणे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढविणे हा या प्रदर्शनाचा उद्देश असल्याचे श्रीकांत तनखीवाले यांनी सांगितले. केवळ वास्तुचित्रातच नाही तर निसर्गचित्र, व्यक्तिचित्रातही या विद्यार्थ्यांचा सौंदर्यबोध दिसून येतो, जो अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी मांडला आहे. स्थापत्य क्षेत्रातील विद्यार्थीच नाही तर चित्रकलेची आणि सौंदर्याची आवड असणाऱ्यांसाठी हे प्रदर्शन म्हणजे एक मेजवानी असल्याची भावना तनखीवाले यांनी व्यक्त केली.
चित्रांमधून उलगडली गृहशिल्पींची कलात्मकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:39 AM
आर्किटेक्ट किंवा गृहशिल्पी यांच्यामध्ये एक कलात्मक दृष्टिकोन असतो. त्या दृष्टिकोनाला केवळ शास्त्रीयतेची जोड असते. मात्र मोठमोठ्या इमारतींचे डिझाईन तयार करताना ही कलात्मकता महत्त्वाची ठरते. त्यामुळेच निर्माण होणाऱ्या वास्तुला सौंदर्यबोध येतो. गृहशिल्पींची हा कल्पक दृष्टिकोन कॅनव्हासवर रेखाटला गेला की त्यालाही सौंदर्याची झळाळी प्राप्त होते. लोकमत भवनच्या जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत सध्या सुरू असलेले चित्रप्रदर्शन गृहशिल्पींच्या याच कलात्मकतेचे दर्शन घडविण्यास पुरेसे आहे.
ठळक मुद्देदर्डा आर्ट गॅलरीत प्रदर्शन : आर्किटेक्टच्या १०० विद्यार्थ्यांचा सहभाग