निशांत वानखेडे
नागपूर : खेळ हे जसे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहेत तसे ते प्राचीन काळातही हाेते. प्राचीन भारतात ‘द्युत’ हा खेळ असाच लाेकप्रिय हाेता व इ. स. तिसऱ्या शतकापासून या खेळाचे अवशेष ठिकठिकाणी आढळून येतात. जगप्रसिद्ध अजिंठ्याच्या लेण्यांमध्ये काेरलेल्या भित्तीचित्रातही द्युत या खेळाचे पुरावे सापडले आहेत. नागपूरच्या पुरातत्त्व संशाेधकांनी याचा शाेध लावला आहे. उल्लेखनीय म्हणजे तथागत बुद्धांनी साधनेच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या अशा खेळांपासून दूर राहण्याचा सल्ला भिक्खूंना दिला हाेता.
राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्त्व विभागाचे प्रा. डाॅ. प्रियदर्शी खाेब्रागडे यांच्या मार्गदर्शनात वायसीसीईचे गणित व मानविकी विज्ञानाचे पुरातत्त्व तज्ज्ञ प्रा. डाॅ. आकाश गेडाम, आर्किटेक्ट माेहिनी गजभिये, ॲड. गणेश हलकारे व डाॅ. अमरदीप बारसागडे यांच्या अभ्यास पथकाने प्राचीन भारतीय खेळांचा अभ्यास करताना अजिंठ्याच्या लेणी क्रमांक २ मध्ये या खेळाचा शाेध लावला. उल्लेखनीय म्हणजे या टीमने कुही तालुक्यातील भिवकुंडच्या गुफांमध्येही द्युत खेळाचे अवशेष शाेधले हाेते. याशिवाय डाॅ. आकाश गेडाम यांच्या नाशिक येथील लेण्यांच्या शाेधपत्रातही या खेळाचे अवशेष सापडल्याचा उल्लेख आहे. डाॅ. गेडाम यांनी सांगितले, अजिंठ्याची दुसऱ्या क्रमांकाची लेणी आकाराने लहान, पण अप्रतिम शैलीतील भित्तीचित्रांनी सजलेले सुंदर असे विहार आहे. ही लेणी इ.स. ५०० ते ५५० मध्ये वाकाटक काळात खाेदली गेली आहेत.
राजा धनंजय यांच्या राज्यातील प्रसंग
डाॅ. गेडाम यांनी सांगितले, लेणीच्या उजव्या भिंतीवर असलेल्या भित्तीचित्रामध्ये जातक कथेमधील हा प्रसंग आहे. कुरू राज्यात राजा धनंजय यांची इंद्रप्रस्थ ही राजधानी हाेती. त्यांच्या राज्यात बाेधिसत्व विदूर पंडित हा विद्वान हाेता. राजा धनंजय संपूर्ण जंबुद्वीपात कुशल द्युत खेळाडू म्हणून प्रसिद्ध हाेता. या चित्रात राजा धनंजय हा यक्ष पूर्णांक यांच्याशी द्युत खेळताना दिसताे. दाेघांमध्ये २४ घरे असलेला द्युत खेळाचा पट मांडलेला आहे आणि प्रतिष्ठित लाेक ताे पाहण्यासाठी जमलेले आहेत. या प्रसंगात राजा धनंजय खेळात हरताना दिसत असून निराश राणी व सर्वलाेक आश्चर्याने पाहत असल्याचे दिसते.
ग्रीक आणि राेमनमध्येही अशा प्रकारचे चाैसर असलेल्या द्युत खेळाचे अवशेष सापडतात. भारतात येणारे या देशातील व्यापारी हा खेळ खेळायचे व त्यांनीच ताे परदेशात नेला किंवा तिकडून आणला असावा. या प्राचीन भारतीय खेळांची माहिती लाेकांसमाेर यावी हा यामागचा उद्देश आहे.
- डाॅ. आकाश गेडाम, गणित व मानविकी विज्ञान, वायसीसीई काॅलेज.