नागपूर : कामठी रोडवर बनत असलेल्या डबलडेकर पुलाच्या कामात गड्डीगोदाम चौक ते गुरुद्वारादरम्यानच्या २०० मीटर अंतरावर फक्त पिलर उभे केले आहे. येथे रेल्वेपुलावरून आव्हानात्मक स्ट्रक्चर तयार करण्यात येत आहे. ९ महिन्यांपासून काम सुरू असतानाही त्या कामाला अजूनही सुरुवात झाली नाही.
गुरुद्वाराजवळ चार स्तरावर वाहनव्यवस्था राहणार आहे. यात कामठी रोड, त्यावर नागपूर-भोपाल रेल्वेलाइन, त्याच्यावर फ्लायओव्हर व त्याच्याही वर मेट्रोचा ट्रॅक राहणार आहे. रस्त्यापासून फ्लायओव्हर १४.९ मीटर उंचीवर राहणार असून, मेट्रोचा ट्रॅक रस्त्यापासून १४.८ मीटर उंचीवर राहणार आहे. ही माहिती गेल्या दीड वर्षापासून महामेट्रोद्वारे प्रेसनोटच्या माध्यमातून दिली जात आहे. परंतु या मार्गावरील बांधकामाचा वेग मंदावला आहे. बांधकामामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे परिसरातील व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. वाहतुकीलाही अडचण होत आहे. रेल्वेच्या संथ कार्यप्रणालीमुळे रेल्वेपुलाच्या कामाला ९ महिन्यांचा कालावधी झाला आहे. त्यासाठी कडबी चौक ते रेल्वेपुलादरम्यानचा रस्ता बंद ठेवण्यात आला होता. आता रस्ता सुरू करण्यात आला आहे. परंतु जड वाहनास निर्बंध घातले आहेत. कारण रेल्वेपुलाची उंची कमी केली आहे. येथून आता कार, अॅम्ब्युलन्सची ये-जा होऊ शकते.