बेला : सीआयसीआर (सेंट्रल इन्स्टिट्यूट फाॅर काॅटन रिसर्च - केंद्रीय कापूस संशोधन संस्था) नागपूरच्या वतीने उमरेड तालुक्यात नुकताच कपाशीवरील गुलाबी बाेंडअळी व्यवस्थापन कार्यक्रम राबविण्यात आला. यात तज्ज्ञांनी शेतात जाऊन शेतकऱ्यांना कपाशीवरील गुलाबी बाेंडअळी, रस शाेषण करणारी कीड व बाेंडसड व्यवस्थापनाबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.
कीटक प्रतिकारक्षमता व्यवस्थापनांतर्गत उमरेड तालुक्यातील मुरादपूर, सुराबर्डी, खापरी, चारगाव, जामगड, सिंदीविहिरी या गावांमध्ये पीकवाढीच्या अवस्थानुरूप कीड व्यवस्थापन, शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी, चर्चासत्रे, माहितीपत्रके वितरण, मोबाइल आधारित ध्वनी संदेश, रेडिओ व दूरदर्शन कार्यक्रम आदी उपक्रमांद्वारे मार्गदर्शन केले जाते. गुलाबी बाेंडअळी व बाेंडसड व्यवस्थापनासाठी कीटकनाशक फवारणी कामगंध सापळे याबाबत माहिती देण्यात आली. या वेळी प्रकल्प समन्वयक तथा कीटक शास्त्रज्ञ डॉ. एस.एस. पाटील, वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. डी.टी. नगराळे, वरिष्ठ संशोधन सहकारी कमलाकर चापले, अभिषेक पातूरकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.