निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: मनुष्य जन्माने नाही तर कर्माने श्रेष्ठ ठरतो. मग समाजालाही कर्माचे हे श्रेष्ठत्व स्वीकारावेच लागते. ‘ती’ या कर्म श्रेष्ठत्वाचे प्रतीक. बदनाम समजल्या जाणाऱ्या वस्तीत तिचा जन्म झाला खरा, पण पांढरपेशा कुलीनांपेक्षाही श्रेष्ठ संस्काराचे प्रकाशपुंज तिच्यात होते. या छोट्या प्रकाशपुंजाला एका कर्मयोगीच्या संस्काराचा आधार मिळाला. या आधाराने ती शिकली, मोठी झाली. समाजसेवेचा वसा तिने स्वीकारला. हा वसा तिला खदानीत काम करणाऱ्या मजुरांच्या अंधारलेल्या संसारापर्यंत घेऊन गेला. आता ती या मजूर कुटुंबातील मुलांच्या, महिलांच्या आयुष्यात आरोग्याचा, शिक्षणाचा प्रकाश पोहचविण्याचा प्रयत्न करतेय.पिंकी सिंग अशी या कर्मयोगिनीची ओळख. रामभाऊ इंगोले यांच्या विमलाश्रमात वाढली. विमलाश्रमात राहणाऱ्या मुलांना शहरातील झोपड्या आणि उच्चभ्रू वस्त्यांमधील समाजाचेवास्तव दाखवित रामभाऊंनी त्यांच्यावर संस्कार केले. या मुलांच्या हस्ते वंचित घटकातील लोकांना कपडे वितरित करण्याचा उपक्रम त्यांनी राबविला. अर्थातच या उपक्रमाचे नेतृत्व सर्वात मोठ्या पिंकीकडेच होते. एकेक वस्ती फिरताना या भावंडांची टीम पाचगाव खदानीत काम करणाऱ्या मजुरांच्या वस्तीपर्यंत पोहचली. येथून तिच्या स्वतंत्र अस्तित्वाचा प्रवास सुरू झाला. वर्ष होते २००२ चे. भावंडांना घेऊन पिंकी यांनी दर रविवारी झाडाखाली मुलांना गोळा करून शिकवणे सुरू केले. या काळात त्यांनी बीएसडब्ल्यू व एमएसडब्ल्यूची पदवी पूर्ण केली. त्यांच्या मैत्रिणी या सेवाकार्यात सामील होत गेल्या. शिक्षणासाठी सुरू केलेले काम येथील महिलांच्या स्वच्छतेपर्यंत पोहचले. सर्वांच्या सहकार्याने त्यांनी २००७ मध्ये मुलांसाठी निवासी शाळा सुरू केली व छोट्याशा कार्याचे वटवृक्षात रूपांतर झाले. या कार्यात मामांचे (राम इंगोले) मार्गदर्शन व शाळेतील मुलांचा आईसारखा सांभाळ करणाऱ्या शोभा ठाकरे यांचा खंबीर आधार मिळाला.
पिंकी सिंग; नागपुरातील मजुरांच्या आयुष्यातील आशेची पणती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 10:35 AM
मजूर कुटुंबातील मुलांच्या, महिलांच्या आयुष्यात आरोग्याचा, शिक्षणाचा प्रकाश पोहचविण्याचा प्रयत्न करतेय. पिंकी सिंग अशी या कर्मयोगिनीची ओळख.
ठळक मुद्देजन्म हाती नव्हता पण तिने निवडले श्रमाचे श्रेष्ठत्व