लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पिंकी वर्मा हिची हत्या गुन्हेगारांच्या इशाऱ्यावर करण्यात आली आहे. मुख्य सूत्रधाराला अटक करण्याच्या मागणीसाठी तृतीयपंथीयांचा एक गट बुधवारी पाचपावली पोलीस ठाण्यात पोहोचला. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींचा शोध घेण्याची मागणी केली. दरम्यान पाचपावली पोलिसांनी आरोपी सागर दिलीप ऊईके (२२) रा. नाईकतलाव आणि अमन राजेश मसराम (२०) रा. रामबाग यांना न्यायालयासमोर सादर करीत २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी घेतली.
२७ वर्षीय पिंकीची सोमवारी दुपारी नाईक तलाव तांडापेठ येथील घरासमोर हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी मंगळवारी दुपारी सागर व अमनला अटक केली. सागरने दिलेल्या माहितीनुसार पिंकी त्याला वसुलीवरून खून करण्याची धमकी देत असल्याने तिची हत्या केल्याचे सांगत आहे. त्याचे म्हणणे आहे की, तो अमनसोबत पिंकीला केवळ जखमी करून तिला अद्दल घडवू इच्छित होता. परंतु पिंकीने केलेला प्रतिकार पाहता ती भविष्यात आपल्यासाठी धोकादायक ठरेल ही भीती लक्षात घेऊन त्यांनी तिचा खून केला.
नाईक तलाव परिसरात अनेक तृतीयपंथी राहतात. ते पिंकीशी जुळले आहेत. त्यांनी बुधवारी पाचपावली पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली. त्यांचे म्हणणे आहे की, आरोपी पोलिसांची दिशाभूल करीत आहेत. पिंकी कुणाकडूनही वसुली करीत नव्हती. परिसरातील एका जागेवरून पिंकीचा वाद सुरु होता. या वादातूनच पिंकीची हत्या करण्यात आली आहे. खरे आरोपी वेगळेच आहेत. यात गुन्हेगार सहभागी आहेत.