नागपूर : वसुली आणि ‘गेम’ करण्याच्या धमकीने त्रस्त होऊन पिंकी वर्माची शेजारच्या युवकाने सहकाºयाच्या मदतीने दिवसाढवळ्या हत्या केली. पाचपावली पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. सागर दिलीप उईके (२२, रा. नाईक तलाव) आणि अमन राजेश मसराम (२० रा. रामबाग) अशी आरोपींची नावे आहेत.
सोमवारी दुपारी २७ वर्षीय पिंकीची पाचपावली ठाण्यांतर्गत नाईक तलाव येथील तांडापेठ परिसरात घरासमोरच हत्या झाली होती. पिंकीच्या भावाने सागर उईकेने जमिनीच्या वादातून हत्या केल्याचे सांगितले. परिसरातील लोकांकडून कोणतीही माहिती न मिळाल्याने पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी सुरू केली. सीसीटीव्हीत अमन पळताना दिसून आल्याने पोलिसांना हत्येचा सुगावा मिळाला. मंगळवारी दुपारी पोलिसांनी दोघांना अटक केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील एका जमिनीबाबत सागरचा पिंकीसोबत वाद सुरू होता. पिंकी परिसरात दबंग युवती म्हणून परिचित होती. तिच्यासोबत नेहमीच अल्पवयीन आणि युवक असायचे. ती त्यांच्यासोबत मोहल्ल्यातील एका ओट्यावर बसून जुगार खेळायची. तिच्याकडे किन्नरांची मोठ्या प्रमाणात ये-जा होती. कुणाशी वाद झाल्यानंतर ती किन्नरासोबत घरी येऊन वाद घालायची. त्यामुळे तिच्यासोबत कुणीही वाद घालत नव्हता.
सागर सुरेंद्रगढ येथील एका बँड पार्टीत काम करीत होता. त्याचे प्रारंभी पिंकीसोबत चांगले संबंध होते. नंतर दोघांमध्ये वाद व्हायचा. सागरने दिलेल्या माहितीनुसार, नुसार पिंकी नेहमीच धमकी देऊन पैसे मागायची. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर कोणत्याही प्रकरणात फसविण्याची धमकी द्यायची. पिंकीकडे चाकू नेहमीच राहायचा. या परिसरात लेडी डॉन म्हणून ओळख निर्माण करण्याची तिची इच्छा होती. काही दिवसांपूर्वीच सागरला ‘गेम’ करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तो चिंतित होता. त्याने याची माहिती रामबाग निवासी मित्र अमनला दिली. दोघांनी पिंकीवर हल्ला करून तिला अद्दल घडविण्याची शपथ घेतली. त्यांना पिंकीची दैनंदिनी माहिती होती. पिंकी दुचाकीने मोहल्ल्यातील ओट्यावरून दुपारी २ वाजता आंघोळीसाठी घरी आली. तिच्या पाठोपाठ आरोपी पोहोचले. त्यांनी तिच्यावर चाकूने वार केले. पिंकीने प्रतिकार केला. ती वाचल्यास आपल्याला धोका असल्याच्या शंकेने त्यांनी तिला जागीच ठार केले. पिंकी स्वत:ला वाचविण्यासाठी शेजारी ईश्वर निखारे यांच्या घराकडे पळाली, पण दरवाज्याजवळच पडली.
नेहमी चर्चेत राहायची पिंकी
पिंकी परिसरात नेहमीच चर्चेत राहायची. मोहल्ल्यातील काही लोक तिच्या वागण्यावर नाराज होते. लोक अनेकदा पोलीस स्टेशन वा कंट्रोल रूमला फोन करून सूचनासुद्धा देत होते. पोलीस घटनास्थळी यायची. पण, लोकांनी तक्रार केल्याचा इन्कार केल्यानंतर पोलीस परत जायचे. पोलिसांनी परिसरातील लोकांच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या असत्या, तर घटना टळली असती. पिंकीविरुद्ध मारहाण आणि धमकीच्या एका प्रकरणाची नोंद आहे.