खापरखेडा : कन्हान नदीच्या पात्रातील तसेच पाटणसावंगी कोळसा खाणीतील काळे पाणी झिरपल्याने पिपळा येथील कोळसा खाणीत मोठ्या प्रमाणात पाणी गोळा झाले. याकडे वेकोलि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या खाणीतील कोळसा उत्पादन ठप्प झाले आहे. पिपळा कोळसा खाणीतील तीन सेक्शनपैकी एका सेक्शनमध्ये महिनाभरापासून मोठ्या प्रमाणात पाणी झिरपत होते. त्यामुळे या सेक्शनमधील कोळसा खोदणाऱ्या दोन एच.डी.एल. मशील पाण्यात बुडाल्या आहेत. हा प्रकार २ फेब्रुवारी रोजी निदर्शनास आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, तेव्हापासून आजवर काहीही उपाययोजना करण्यात आली नाही. या खाणीत सीम ५, ८ क्रमांकाच्या सेक्शन क्रमांक - ३ मधील कोळसा उत्पादन ठप्प झाले आहे. हे सेक्शन पश्चिमेकडे इसापूर गावापर्यंत पोहोचले असून, गावालगत कन्हान नदी वाहते. या सेक्शनमध्ये ८० पिल्लर इन्कलाईन खोदण्याची कागदोपत्री परवानगी आहे. पिपळा कोळसा खाणीत शिरले पाणीअधिकाऱ्यांनी या ठिकाणी सहा पिल्लर अधिक खोदकाम केले आहे. खोदकामासाठी ब्लास्टिंगचा वापर केला जात असल्याने पाणी झिरपण्याचे प्रमाण वाढल्याचे सूत्रांनी सांगितले. सुरुवातीला एक इंच पाण्याचा प्रवाह होता तो आता १० इंच झाला आहे. या एका महिन्यात सहा पिल्लर अर्थात एकूण ९० फूट पाणी गोळा झाले. पाणी बाहेर काढण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून खाणीच्या बाहेर तीन बोअर केले आहे. यातील दोन बोअर निकामी झाले आहेत. यावर अंदाजे तीन कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे जाणकारांनी सांगितले. सदर तिन्ही बोअर इसापूर मार्गावर आहे. यातील एका बोअरमधून पाण्याचा उपसा सुरू आहे. यासाठी परिसरात जागा विकत घेऊन आणखी बोअर खोदणे गरजेचे आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या खाणीत पाणी झिरपत असल्याचे निदर्शनास येताच शिफ्ट ओव्हरमन व वर्क मेन इन्स्पेक्टर यांनी आॅव्हरमेन बुकात त्याची नोंद केली होती. याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आणि ब्लास्टिंग सुरूच ठेवले. सदर ओव्हरमेन बुक गायब करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
पिपळा कोळसा खाणीत शिरले पाणी
By admin | Published: February 28, 2015 2:18 AM