पिपळा (डाक बंगला): प्रेमसंबंधातून महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आल्यानंतर सावनेर मार्गावरील पिपळा (डाक बंगला) हे गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
ब्रिटिशकालीन घटनांचा साक्षीदार असलेल्या या गावात सध्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील काही दिवसात खून, दुकान लुटणारे बंदूकधारी, चोरी, मारहाण, बाईक चोरीच्या घटना तसेच इतर गुन्हेगारीचे प्रमाण येथे वाढले आहे. त्यामुळे खापरखेडा पोलीस पिपळा (डाक बंगला) येथील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश कधी लावणार, असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.
१० रोजी येथे चार तरुणांनी मध्यरात्री संतोष सोलंकीचा निर्घृण खून केला. १७ ऑगस्टला रात्री ७.३० वाजताच्या दरम्यान तुलसी ज्वेलर्समध्ये बंदुकधारी दरोडेखोर शिरले. त्यांनी बंदुकीच्या धाकावर महामार्गावरील दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र मिलन सोनी व सीमा सोनी यांच्या सतर्कतेमुळे तो फसला. २९ रोजी रामदास मेश्राम यांनी महिला शिष्य कुसुम चव्हाण हिची हत्या केली. पिपळा परिसरामध्ये हनुमान मंदिर व पिसामाय मंदिर, जुनी वस्ती येथे दानपेट्या चोरी तसेच बाईक चोरी घटना झाल्या. बाबा आमटे युवा पार्क येथे लाईट चोरीला गेले. महामार्गावर असलेले एटीएमसुद्धा १८ ऑगस्टला मध्यरात्री फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. सोमवारी दि. ३० ला मध्यरात्रीच्या सुमारास मोहन तागडे यांचे ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरटे पळवून नेत असताना काशीनाथ तागडे यांची गाडी आल्याने ट्रॅक्टर सोडून चोरटे पळून गेले. परिसरात सुरू असलेले घर बांधकामाच्या साहित्यावर चोरटे हात साफ करीत आहेत. जुनी वस्ती येथील सुखदेव मलवे यांच्या ६० हजार रुपये किमतीच्या दोन गाईसुद्धा चोरट्याने गोठ्यातून पळविल्या. वाढत्या बेरोजगारीमुळे परिसरात भुरट्या चोरट्यांची संख्या वाढली आहे. यातच सराईत गुन्हेगारही सक्रिय झाले आहेत. त्यामुळे पिपळा येथील वाढत्या गुन्हेगारीकरणाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी येथे रात्रीची गस्त वाढवावी तसेच संशयित व्यक्तीची चौकशी करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
---
पिपळा (डाक बंगला) परिसरात मागील अडीच महिन्यात खून, लुटमार, चोरी या घटनात वाढ झाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देऊन रात्रीची गस्त वाढवावी.
प्रल्हाद ठाकरे, पोलीस पाटील, पिपळा (डाक बंगला)