नागपूर : उपराजधानीत शस्त्रांच्या खरेदी-विक्रीचा मुद्दा ऐरणीवर आला असून पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. ऐन निवडणूकीच्या काळात पिस्तुल खरेदी-विक्रीच्या आणखी एका रॅकेटचा भंडाफोड झाला आहे. एका तरुणाच्या घरातून पिस्तुल जप्त करण्यात आले व त्यानंतर पुढील लिंक पोलिसांना सापडल्या. गुन्हेशाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली.
एका युवकाच्या घरातील हालचालींवर पोलिसांना संशय आला. त्यामुळे त्यांनी घरावर छापा घातला. या छाप्यात दोन काडतूस आणि पिस्तुलसह खरेदी-विक्री करणाऱ्यांची लिंक सापडली. पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली असून दोन आरोपी फरार झाले आहेत. मोहम्मद फिरोज उर्फ मोहम्मद आबिद अंसारी (२४, दीनबंधू सोसायटी, गुलशननगर) याच्याकडे पिस्तुल असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्याने हे पिस्तुल करीम राजा मोहम्मद युनूस (२४,मेमन कॉलनी, जुना कामठी रोड, कळमना) याच्याकडून घेतल्याचे सांगितले.
पोलिसांनी त्यालादेखील अटक केली. त्याच्या चौकशीत त्याने पिस्तुल मोहम्मद शाकिब उर्फ पटेल मोहम्मद सिद्दीकी (२८, संजीवनी कॉलनी, यशोधरानगर) याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक करून पुढील लिंक शोधली असता अब्दुल सोहेल उर्फ सोबू (सतरंजीपुरा) आणि अजहर (यशोधरानगर) यांच्याकडून पिस्तुल खरेदी केल्याची माहिती त्याने दिली. पोलिसांकडून या दोघांचाही शोध सुरू आहे. सोबू हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. चोरीच्या प्रकरणात अनेकदा त्याला अटक सुद्धा झाली आहे. पुढील चौकशीसाठी तिन्ही अटकेतील आरेापींना कळमना पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद ठाकरे, नवनाथ देवकाते, मिलींद चौधरी, प्रवीण लांडे, अमोल जासूद, संतोष चौधरी, मनिष रामटेके, अनिल बोटरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.