लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - मोमिनपुऱ्यातील कुख्यात गुंड मोहम्मद फैय्याज मोहम्मद नियाज (वय २१) याच्या मुसक्या आवळून पोलिसांनी त्याच्याकडून दोन जिवंत काडतूस तसेच एक पिस्तूल जप्त केले. फुटबॉल ग्राऊंडजवळ सोमवारी पहाटे पोलिसांनी ही कारवाई केली.
आरोपी फैय्याज हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला तसेच अन्य असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत. त्याचे वडिलही काही वर्षांपर्यंत कुख्यात गुन्हेगार म्हणून ओळखले जायचे. फैय्याज कुणाचा तरी गेम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती तहसीलचे ठाणेदार जयेश भंडारकर यांना सात दिवसापूर्वी मिळाली, तेव्हापासून ते आणि त्यांचे सहकारी फैय्याजला शोधत होते. सोमवारी पहाटे १.२० वाजता तो मोमिनपुऱ्यातील फुटबॉल ग्राऊंडजवळ संशयास्पद अवस्थेत घुटमळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी तिकडे जाऊन त्याच्या मुसक्या बांधल्या. त्यांच्याजवळ पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस आढळले. ते जप्त करण्यात आले. पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार जयेश भंडारकर, द्वितीय निरीक्षक बलरामसिंग परदेशी यांच्या नेतृत्वात हवालदार लक्ष्मण शेंडे, शैलेष दाबोले, नायक किशोर गरवारे, नाझिर शेख आणि इकबाल शेख यांनी ही कामगिरी बजावली.
----
पोलिसांची दिशाभूल
आरोपी फैय्याजची पोलिसांनी सोमवारी दिवसभर चाैकशी केली, मात्र त्याने दिशाभूल करणारी माहिती दिली. त्याने पिस्तूल कुठून आणले आणि त्याचा वापर कुणासाठी करणार होता, हे त्याने स्पष्ट केले नाही. पोलीस त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करून त्याच्या कोठडीची मागणी करणार आहेत.
----