नागपूर : पोलिसांच्या डोळ्यात धूळ झोकून मध्यप्रदेश, राजस्थानसह उत्तरेकडील भागातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पिस्तुलं, देशी कट्टे आणली जात आहेत. विशेष म्हणजे, अधून मधून या संबंधाने मोठ्या गुन्ह्यांची नोंद होत असताना तपास यंत्रणांकडून केवळ त्या-त्या वेळी, तेवढ्यापुरती कारवाई केली जात असल्याने गुन्हेगारांसोबत शस्त्र तस्करांचे ईरादे बुलंद झाले आहेत. त्याचमुळे जागोजागच्या गुन्हेगारांकडून बहुतांश गुन्ह्यात त्याचा सर्रास वापर केला जात आहे.
महाराष्ट्रात आधी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमधून मोठ्या प्रमाणात देशी बनावटीची पिस्तुलं, माउझर यायची. ही घातक शस्त्रे निर्माण करणाऱ्या कारखान्यांवर अलिकडे धडाधड धाडी पडल्याने तिकडे शस्त्र बनविणारे आणि त्याची खेप वेगवेगळ्या प्रांतात सप्लाय करणारे तस्कर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पळून गेले. आता ते तेथे अतिशय शिताफीने ही घातक अग्निशस्त्र बनवित आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील पाचोरी जवळ कट्टे, पिस्तुल, माऊझर बनविण्याचा मोठा अवैध कारखाना आहे. येथे बनलेली शस्त्रे महाराष्टाच्या अनेक गाव-शहराला लागून असलेल्या सिमेवरून बिनबोभाटपणे आणली जाते आणि ती विदर्भ मराठवाडाच नव्हे तर, खानदेश, पुणे, ठाणे, मुंबईतही बेमालुमपणे पोहचविली जाते. शस्त्राच्या तस्करीसाठी बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी तस्करांनी आपले नेटवर्क प्रस्थापित केले आहे. सोनाळा, टुनकी आदी ठिकाणी शस्त्र तस्करांचे अड्डे असल्याची कुणकुण ठाणे क्राईम ब्रान्चसह झारखंड एटीएसलाही काही महिन्यांपूर्वी लागली होती आणि त्या संबंधाने सहा महिन्यांपूर्वी तेथे छापेही पडले होते. मोठ्या प्रमाणावर देशी पिस्टल, माऊजर, जीवंत काडतूस, मॅगझिन जप्त होऊनही अग्निशस्त्र तस्करीच्या विषयाकडे गंभीरपणे लक्ष दिले गेले नसल्याने या धंद्यात गुंतलेल्यांचे ईरादे आता बुलंद झाले आहेत. उल्हासनगरात आमदार गायकवाड यांच्याकडून शिवसेना पदाधिकाऱ्यावर झालेला गोळीबार आणि आता मुंबईत माजी नगरसेवक घोसाळकर यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. याचमुळे महाराष्ट्रात बहुतांश मोठ्या गुन्ह्यात होत असलेला अग्निशस्त्रांच्या वापराचा विषय गृहखाते अन् पोलीस दलाच्या पटलावर आला आहे.
ठिकठिकाणच्या गुंडांकडे 'घोडा'
महाराष्ट्रातील महानगरचं नव्हे तर छोट्या मोठ्या गावातील गुंडांकडेही आज सर्रासपणे माऊजर, पिस्तुल, कट्टे आढळतात. प्रतिस्पर्धीच नव्हे तर आपल्या अवतीभवतीच्या गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी आणि खंडणी वसुलीसारख्या गुन्ह्यात पीडिताला चमकविण्यासाठी गुंड या अग्निशस्त्राचा वापर करतात. अनेक जणांकडे त्याचा परवानाही नसतो. गुन्हेगारी वर्तुळात अग्निशस्त्राला घोडा म्हटले जाते. ठांय. ठांय ... करत कुणाचाही जीव घेणारा घोडा अर्थात पिस्तुल केवळ दोन, पाच, दहा हजारांत गुन्हेगारांना उपलब्ध होते, हे आणखी एक विशेष !