लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : शहरातील मुख्य वर्दळीचा चाैक असलेल्या गांधी चाैकातील खड्डा वाहनचालक व ये-जा करणाऱ्यांसाठी धाेकादायक ठरत आहे. ऐन चाैकातील या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचल्याने अंदाज चुकून याठिकाणी अपघात घडतात. त्यामुळे हा खड्डा बुजविणार काेण, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
शहरातील या मुख्य चाैकात अनेकदा अपघात झाले आहेत. त्यात अनेकांना आपला जीवही गमवावा लागला. या चाैकातून छिंदवाडा, बैतुल, काटाेल, कळमेश्वर तसेच इतर लांब पल्ल्याची वाहने धावतात. शहराच्या मधाेमध असलेल्या चाैकातील खड्ड्याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष हाेत आहे. यापूर्वी या ठिकाणी असलेल्या विद्युत डीपीमुळे वाहतुकीला अडथळा हाेत असल्याने ती हटविण्यात आली. त्यानंतर पाणीपुरवठ्याची पाईपलाईन लिकेज झाल्याने खाेदकाम करण्यात आले. त्यामुळे अनेक दिवस वाहतुकीला अडसर निर्माण झाला. सध्या चाैक माेकळा आहे, परंतु खड्डे बुजविण्याची तसदी संबंधित विभागाने घेतली नसल्याने या चाैकात वाहतुकीला अडसर ठरत आहे. शिवाय, हा खड्डा अपघाताला कारणीभूत ठरत असल्याने ताे बुजविण्याची मागणी वाहनचालकांसह नागरिकांनी केली आहे.