लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : शहरातील माेवाड (ता. नरखेड) मार्गावरील वाहतूक काेंडीची समस्या साेडविण्यासाठी रेल्वे फाटकाजवळ फ्लाय ओव्हरची निर्मिती करण्यात आली. या फ्लाय ओव्हरवर अल्पावधीतच खड्डे तयार झाले असून, त्यावरून वाहने चालविताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. ते खड्डे अपघातांना निमंत्रण देत असून, बुजविण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे.
नागपूर-दिल्ली रेल्वेमार्ग नरखेड शहरातून गेला आहे. हा रेल्वेमार्ग नरखेड-माेवाड मार्गाला छेदून गेला असून, तिथे असलेल्या फाटकाजवळ वाहतूक काेंडी व्हायची. ही समस्या साेडविण्यासाठी या फाटकाजवळ काही वर्षांपूर्वी फ्लाय ओव्हरची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे हा फ्लाय ओव्हर नरखेडहून माेवाड मार्गे वरुड, पुसला, अमरावती, जलालखेडा व पांढुर्णाकडे जाणाऱ्या वाहनचालकांची साेय झाली.
या फ्लाय ओव्हरवरून नरखेड शहरातील पंढरीनाथ महाविद्यालय, राष्ट्रमाता महाविद्यालय, नाडेकर विज्ञान महाविद्यालय, ऑरेंज सिटी काॅन्व्हेंट तसेच देवग्राम (थूगावदेव), माेवाड येथील महाविद्यालयांमध्ये शिकणारे बहुतांश विद्यार्थी व संत्रामंडीमध्ये येणारे शेतकरी व व्यापारी याच फ्लाय ओव्हरवरून प्रवास करतात. या फ्लाय ओव्हरवर संत्रामंडी ते नाडेकर महाविद्यालयादरम्यान ठिकठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. या मार्गावरील गतिराेधकही खराब झाले आहे. या बाबी अपघाताच्या पथ्यावर पडणाऱ्या असल्याने खड्डे व गतिराेधकांंची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.