लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : तालुक्यातील कुही-साळवा हा महत्त्वाच्या मार्गापैकी एक आहे. सतत रहदारी असलेल्या या राेडवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, या खड्ड्यांतून मार्गक्रमण करणे वाहनचालकांना कठीण झाले आहे. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात एका तरुणाला जीव गमवावा लागला. त्यामुळे या राेडची दुरुस्ती कधी करणार, असा प्रश्नही साळवा, पांडेगाव, नेरी यासह परिसरातील गावांमधील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या राेडवर ठिकठिकाणी खड्डे तयार झाले असून, खड्डे चुकवून मार्गक्रमण करण्याच्या नादात झालेल्या अपघातात राजाेला (ता. कुही) येथील साटकर या तरुणाला जीव गमवावा लागला. या खड्ड्यांमुळे तसेच परिसरात गिट्टी विखुरली असून त्यावरून दुचाकी वाहने घसरत असल्याने अनेकांना दुखापतही झाली आहे. दुसरीकडे, खड्ड्यांमुळे वाहनांचेही नुकसान हाेत असल्याने नागरिकांवर आर्थिक भुर्दंड बसत आहे.
कुही तालुक्यातील काही तरुण माैदा येथील एनटीपीसी व इतर कंपन्यांमध्ये नाेकरी करतात. ते राेज ये-जा करीत असून, माैद्याला जाण्यासाठी तसेच शेतकरी, नाेकरदार, व्यापारी व इतर नागरिक मालाच्या वाहतुकीसाेबतच माैदा व भंडारा येथे जाण्यासाठी याच मार्गाचा नियमित वापर करतात. हा मार्ग पुढे चापेगडी, माथनी, माैदा व भंडाऱ्याला जाेडला असल्याने वर्दळीचा बनला आहे. खड्ड्यांमुळे या मार्गावरील प्रवास जीवघेणा झाला असल्याने या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य बालू ठवकर, प्रमोद घरडे, सतीश चांदपूरकर, अंबादास धनजोडे, निळकंठ धनजोडे, अशोक चांदपूरकर, राजू कांबळे, योगेश केळझरकर, राहुल घरडे, हेेमराज चाफेकर यांच्यासह नागरिकांनी केली आहे.