लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्वरसाधना, संस्कार भारती व विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सायंटिफिक सभागृहात पं. प्रभाकर देशमुख स्मृती समारोह आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रख्यात संतूर वादक पं. वाल्मिक धांडे व ज्येष्ठ गायिका डॉ. कल्याणी देशमुख यांचे गायन-वादन रंगले. या कार्यक्रमात या दोन्ही कलावंतांसह दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राचे नवनियुक्त संचालक डॉ. दीपक खिरवडकर यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनराईचे विश्वस्त गिरीष गांधी तर प्रमुख अतिथी म्हणून संस्कार भारतीच्या अध्यक्ष कांचन गडकरी, स्वरसाधनाचे कार्याध्यक्ष आ. अनिल सोले, संगीततज्ज्ञ बाळासाहेब पुरोहित व पं. जगदीश टेकाडे उपस्थित होते. निवेदन वेदिका पिंपळापुरे यांनी केले. गायिका डॉ. कल्याणी देशमुख यांचे शास्त्रीय गायन श्रोत्यांंच्या काना-मनाचा वेध घेऊन गेले. जन्मत: सुरेल-निकोप स्वरांची देण, लयकारीचे विभ्रम, प्रभावी गमक व मिंड या वैशिष्ट्यांसह गायिकेने राग बिहागचे सादरीकरण केले. विलंबित झपतालातील पिया मोरा मनवा...व द्रुत लयीतील पियरवा मेरी मान ले तू...व तराणा सुरेलतेने सादर केला. संत कबीरदासाच्या प्रसन्न भजनासह रेहना नही देस विराना हैं...या गायनाचे सुखद समापन झाले. गायिकेला तबल्यावर विवेक संगीत, हार्मोनियम-संदीप गुरमुले व तानपुऱ्यावर प्रभा लपालीकर यांनी सहसंगत केली. यानंतर पं. वाल्मिक धांडे यांचे मधूर संतूर वादन रंगले. राग परियाकल्याणसह सादरित हे वादन श्रृतीसुखद होते. रागांची शुद्धता, वादन कुशलता लयकारीवरील पकड या वैशिष्ट्यांसह हे वादन श्रोत्यांना सुखद अनुभव देऊन गेले. राम खडसे यांनी सहतबला संगत केली. पद्मजा सिन्हा, अश्विनी लुले, छाया वानखेडे व सुप्रिया जोशी यांनी संस्कार भारती गीत व सरस्वती वंदनेसह कार्यक्रमाचा शुभारंभ केला. मनोज श्रोती, श्रीकांत बंगाले, मुकुंद मुळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
पियरवा मेरी मान ले तू...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 1:16 AM
स्वरसाधना, संस्कार भारती व विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सायंटिफिक सभागृहात पं. प्रभाकर देशमुख स्मृती समारोह आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रख्यात संतूर वादक पं. वाल्मिक धांडे व ज्येष्ठ गायिका डॉ. कल्याणी देशमुख यांचे गायन-वादन रंगले.
ठळक मुद्देपं. प्रभाकर देशमुख स्मृती समारोह : पं. वाल्मिक धांडे, कल्याणी देशमुख यांचे गायन-वादन रंगले