राहुल पेटकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : राज्य शासनाच्यावतीने ‘मागेल त्याला शेततळे’ ही कल्याणकारी याेजना राबविली जायची. यात शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात शेततळ्याची निर्मिती करण्यासाठी प्रती शेततळे ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जायचे. रामटेक तालुक्यात २०१८-१९ मध्ये १३ शेतकऱ्यांना शेततळे मंजूर करण्यात आली. शेतकऱ्यांनी स्वखर्चाने त्या शेततळ्यांची निर्मितही केली. मात्र, त्यांना आजवर अनुदानाचा एक रुपयादेखील देण्यात आला नाही. त्यामुळे ही कल्याणकारी याेजना बासनात गुंडाळल्यागत झाली आहे.
जमिनीतील पाण्याची पातळी वाढावी तसेच सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य शासनाच्यातीने ‘मागेल त्याला शेततळे’ ही याेजना राबविली जात आहे. त्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे अनुदानही दिले जाते. त्याअनुषंगाने सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात रामटेक तालुक्यातील १३ शेतकऱ्यांना शेततळे मंजूर करण्यात आले. नियमाप्रमाणे लाभार्थी शेतकऱ्यांनी आधी शेतात शेततळ्यांची निर्मिती केली आणि नंतर शासनाकडे अनुदानाची मागणी केली. त्यांना अद्यापही अनुदानाची रक्कम देण्यात आली नाही, अशी माहिती लाभार्थ्यांनी दिली.
तालुक्यातील काही लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम प्राप्त झाली आहे. ज्या शेतकऱ्यांना शेततळ्यांची निर्मित करूनही अनुदानाची रक्कम मिळाली नाही, ते मंडळ व तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अनुदान मिळवण्यासाठी हेलपाटे मारत आहेत. वास्तवात, काेरडवाहू शेतीसाठी शेततळे वरदान ठरले हाेते. शेततळ्यांमुळे जमिनीतील पाण्याची वातळी वाढण्यास मदत झाल्याने विहिरींची पाणीपातळी उंचावली हाेती. शिवाय, काही शेतकऱ्यांनी या शेततळ्यांचा वापर मत्सपालनासाठी करीत जाेडधंदाही सुरू केला हाेता. ही याेजना थंडबस्त्यात असल्याने शेतकऱ्यांचा हिरमाेड हाेत आहे. दुसरीकडे, रखडलेल्या शेततळ्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणीही शेतकरी करीत आहेत.
....
कृषी विभागाचा नवा आदेश
काेराेना संक्रमणामुळे निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना अनुदान देणे शक्य झाले नाही, अशी माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ६ मे २०२० राेजी एक आदेश जारी करीत ‘मागेल त्याला शेततळे’ ही याेजना तात्पुरती बंद करण्याचे कृषी विभागाला कळविले. त्याअनुषंगाने राज्याच्या कृषी आयुक्तांनी सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना नवीन शेततळ्यांची कामे करून नये, असे पत्राद्वारे कळविले. जुनी कामे पूर्ण करण्याचे आदेशही या पत्राद्वारे दिले आहेत. शासनाने काटकसरीचे धाेरण स्वीकारल्याने या याेजनेवरील ३३ टक्के खर्च कमी हाेणार असल्याने पुरेसा निधी उपलब्ध हाेणार नाही.
...
लाभार्थी शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या फाईल्स शासनाकडे मंजुरीसाठी पाठविल्या आहेत. परंतु, शासनाकडून अद्यापही अनुदान प्राप्त झाले नाही. ते प्राप्त हाेताच संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाईल.
- स्वप्निल माने,
तालुका कृषी अधिकारी, रामटेक.