नागपूर : कोरोनाची दुसरी लाट परतवून लावण्यासाठी येत्या १३ जानेवारीपर्यंत योजना तयार करण्यात यावी व त्यानुसार राज्य सरकारला आवश्यक प्रस्ताव सादर करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चंद्रपूर जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांना दिला.
शास्त्रज्ञांना कोरोना विषाणूचे स्वरूप बदलल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यानुसार नवीन कोरोना विषाणू जास्त घातक आहे. त्यामुळे संबंधित योजना तयार करताना हा पैलू विचारात घेण्यात यावा असेदेखील न्यायालयाने सांगितले. तसेच, संबंधित योजना व प्रस्ताव न्यायालयातही सादर करण्याचे निर्देश दिले. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
यासंदर्भात माजी खासदार नरेश पुगलिया व इतरांनी जनहित याचिका दाखल केली आहे. चंद्रपुरात जीवनावश्यक औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. याशिवाय करोना रुग्णांसाठी रुग्णालयात पुरेशा संख्येत खाटा उपलब्ध नाहीत. विलगीकरणात ठेवलेल्या रुग्णांकडे प्रशासन लक्ष देत नाही. त्यांना औषधे, भोजन व इतर सुविधा मिळत नाहीत असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. श्रीरंग भांडारकर यांनी कामकाज पाहिले.
-------------
गुल्हाणे, मोहिते न्यायालयात उपस्थित
चंद्रपूर जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे व महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी उच्च न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. न्यायालयाने त्यावर समाधान व्यक्त केले. त्यासोबतच कोरोना चाचणी केंद्र व ऑक्सिजन खाटांची संख्या वाढविणे आवश्यक असल्याचे सांगितले. उत्तर दाखल करण्यात उदासीनता दाखवल्यामुळे या अधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात आला होता.