लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील सर्व केंद्र प्रमुख व शिक्षकांनी कोरोनानंतरच्या काळासाठी शिक्षणाचे योग्य नियोजन करण्यावर भर दिला पाहिजे. तसेच जिल्ह्यातील इतर शिक्षकांनी व केंद्र प्रमुखांनी आतापर्यंत राबविण्यात आलेल्या अभिनव उपक्रमातून प्रेरणा घेऊन त्यांना आपल्या शाळांमध्येदेखील राबवावे, अशी सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केली आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांच्या कार्याचे सादरीकरण कार्यक्रमाचे त्यांच्या हस्ते रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत आदर्श शिक्षकांच्या कलागुणांचा उपयोग अन्य शाळांमध्ये करण्यासाठी हा उपक्रम जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील १३ ही तालुक्यांचा समावेश आहे. या उपक्रमात नागपूर ग्रामीण, हिंगणा, कामठी व कळमेश्वर या चार तालुक्यातील प्रत्येकी दोन शिक्षकांनी त्यांच्या शाळेमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने केलेले प्रयत्न व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी उपयुक्त उपक्रमाचे यावेळी सादरीकरण केले. या उपक्रमाचा लाभ जिल्ह्यातील अन्य शिक्षकांना करून देण्यासाठी या कार्यक्रमाचे प्रक्षेपण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून करण्यात आले आहे. रामटेक तालुक्यातील हसापूर जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका मीना शामकुवर, सालई जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक गणेश बेलखुडे, पारशिवनी तालुक्यातील गरांडा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक खुशाल कापसे, बखारी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक ओंकार पाटील, मौदा तालुक्यातील घोटमुंडरी येथील शिक्षक म. अ. कांबळे व बेरडेपार जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आनंद नंदनवार यांनी सादरीकरण केले.