लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंडिगो एअरलाईन्सच्या ६ई ५३८८ मुंबई-नागपूर विमानाच्या उड्डाणादरम्यान कार्गो सेक्शनमध्ये आगीसंदर्भात वार्निंग झाल्यानंतर विमान परत मुंबई विमानतळावर उतरविण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ६.४० वाजता नागपूरकडे रवाना झाले आणि रात्री ८.१२ वाजता नागपुरात पोहोचले.गुरुवारी दुपारी १२.३० वाजता विमानाने मुंबईहून उड्डाण घेतल्यानंतर १.१० वाजता वैमानिकांना विमानाच्या कार्गो सेक्शनमधून वार्निंग मिळाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे वार्निंग फायर इंडिकेशन (संकेत) होते. विमानाने जवळपास अर्धे अंतर कापले होते. वैमानिकांनी लगेचच विमान मुंबईत उतरविण्याचा निर्णय घेतला आणि दुपारी २.२२ वाजता लॅन्डिंग करण्यात आले. आपात्कालीन व्यवस्थेंतर्गत विमानाच्या दरवाजापर्यंत शिडी लावून प्रवाशांना उतरविण्यात आले आणि बसमध्ये बसवून टर्मिनल इमारतीपर्यंत आणले. लगेचच विमानाची तपासणी करण्यात आली. दुपारी ३.०४ वाजता विमान सुरक्षित असल्याची घोषणा करण्यात आली. शिफ्ट पूर्ण झाल्याने दुसऱ्या चालक दलासोबत सायंकाळी ६.४० वाजता विमानाला नागपूरकडे रवाना करण्यात आले. विमानातील प्रवासी आणि नागपूर निवासी प्रतीक यांनी या घटनेनंतर गुरुवारी प्रवास रद्द केला. काही लोकांनी तिकिटाची रक्कम परत घेतली, तर काही प्रवाशांना अन्य विमानाने नागपुरात पाठविण्यात आले.