लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आशा व गटप्रवर्तक यांच्या सर्व्हे भत्ता वाढ व मानधनवाढीच्या अंमलबजावणी संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू व त्याची लवकरच अंमलबजावणी करू, असे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. त्यामुळे आशा व गट प्रवर्तक यांचा संप आता स्थगित करण्यात आला आहे. आयटकचे राज्य सरचिटणीस श्याम काळे यांच्या नेतृत्वात नागपूर दौऱ्यावर आलेले राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी आशा व गट प्रवर्तक शिष्टमंडळाने भेट घेतली व चर्चा केली.आशा व गटप्रवर्तक यांनी कृती समितीच्या नेतृत्वाखाली शासनाला २८, २९, ३० सप्टेंबरला काम बंद करण्याची नोटीस दिली होती. त्याला संपूर्ण राज्यभर आशांनी प्रतिसाद देऊन सर्वेक्षणाचे काम बंद केले होते. त्यामुळे मागील संपाची मानधन वाढ, सर्वेक्षणाचे ३०० रुपये प्रति दिवस, २५ घरांचा सर्व्हे, सर्वेक्षणात आशांच्या बरोबरीने आरोग्य खात्याचे कर्मचारी गट प्रवर्तकांना समसमान वाढ तसेच ६२५ रु इत्यादी मागण्या घेऊन संप निर्धारित केला आहे. मुख्यमंत्र्यांनी या सर्व मागण्यांची दखल घेऊन काही मागण्या मान्य केल्या आहेत. अन्य मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेला मान देऊन २८ पासूनचा संप स्थगित करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री यांनी केले होते. उर्वरित मागण्यांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी एक बैठक लावण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री दिले. त्यावर कृती समितीच्या नेत्यांनी सहमती दर्शवली. पुकारलेले काम बंद आंदोलन २१ दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आशा व गट प्रवर्तकांचा नियोजित संप स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 1:16 AM