गणेश हूड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणेश टेकडी मंदिर उड्डाण पुलाखालील १६२ दुकाने परत घेण्याची योजना दुकानाच्या किमतीच्या अडीच पट रक्कम दुकानदारांना देण्याच्या मुद्द्यावर बासनात गुंडाळण्याची शक्यता आहे.
रेल्वे स्टेशनचा विस्तारात गणेश टेकडी उड्डाणपूल तोडून सहापदरी मार्ग बनविण्यात येणार आहे. महामेट्रो हा प्रकल्प राबविणार आहे. यासाठी ३० वर्षांच्या लीजवर दिलेली १६२ दुकाने परत घ्यावयाची झाल्यास दुकानदारांनी केलेल्या मागणीनुसार, महापालिकेला यासाठी ३४ कोटी खर्च करणे शक्य नसल्याने दुकाने परत घेण्याचा प्रस्ताव अडचणीत आला आहे.
हा उड्डाणपूल २००८ मध्ये बांधण्यात आला. या प्रकल्पावर १६ कोटी २३ लाख रुपये खर्च करण्यात आले. ही रक्कम लीजवर देण्यात आलेल्या दुकान गाळ्यातून उभारण्यात आली होती. यासाठी महापालिका व दुकानदार यांच्या करार करण्यात आला होता. त्यानुसार, जागा परत घ्यावयाची झाल्यास अडीच पट मोबदला द्यावा लागणार आहे. यावर सभागृहाला निर्णय घ्यावा लागेल.
या उड्डाणपुलामुळे रेल्वे स्टेशनचा विस्तार खोळंबला आहे. यासाठी हा उड्डाणपूल तोडणे आवश्यक आहे, तसेच या पुलाच्या दोन्ही बाजूने वाहतुकीची कोंडी होत आहे. या पुलावर जाण्यासाठी रेल्वे पुलाजवळील मानस चौक आणि त्या बाजूने जयस्तंभ चौक असे दोन मार्ग आहेत. या दोन्ही चौकांत दिवसभर वर्दळ असते. यावर अद्याप पर्याय शोधण्यात आलेला नाही.
२९ सप्टेंबर, २०१८ रोजी सभागृहात गणेश टेकडी उड्डाणपूल तोडण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला होता, परंतु तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकल्प रखडला आहे.
...
पुनर्वसनाची जागा स्टेशनपासून लांब
दुकानदारांचे पुनर्वसन मानस चौकालगतच्या मध्य प्रदेश परिवहन विभागाच्या जागेवर केले जाणार आहे. ही जागा रेल्वे स्टेशनपासून दूर आहे. या ठिकाणी व्यवसाय होणार नाही. अशी भीती दुकानदारांना आहे. त्यामुळे त्यांना हे पुनर्वसन मान्य नाही. रोख मोबदला देण्याची त्यांनी मागणी केली आहे. ही रक्कम ३४ कोटींच्या आसपास आहे. मनपाची आर्थिक स्थिती विचारात घेता, ही रक्कम देण शक्य नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
......
अनेकांनी दुकाने भाड्याने दिली
उड्डाणपुलाखाली लीजवर घेतलेली दुकाने अनेकांनी दुसऱ्याला भाड्याने दिली आहे. काही दुकान मालकांनी यावर बँक कर्ज घेतले आहे. या कर्जाची परतफेड करावयाची आहे. यामुळे दुकाने परत घेताना अडचणी येणार आहेत.
...
मनपा कायद्यात जागा परत घेण्याची तरतूद
महापालिका कायद्याच्या कलम ८१(ब) नुसार आवश्यक कामासाठी लीजवर दिलेली जागा परत घेण्याची तरतूद आहे. यासाठी नोटीस बजावावी लागते, परंतु दुकानदारांनी याला न्यायालयात आव्हान दिल्यास प्रकरण प्रलंबित राहण्याचा धोका आहे.
..
- उड्डाणपूल २००८ मध्ये बांधण्यात आला.
- ३० वर्षांच्या लीजवर १६२ दुकाने दिली.
- २०१८ मध्ये मनपाच उड्डाणपूल तोडण्याचा निर्णय
- ऑगस्ट, २०२० मध्ये दुकाने खाली करण्याची नोटीस
- दुकानदारांची अडीच पट मोबदल्याची मागणी