नागपूर : सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून तीन वर्षांपूर्वी केलेले पडिक जागेवरील वृक्षारोपण आता चांगलेच बहरले आहे. या माध्यमातून जवळपास ३१ हेक्टर पडिक जमिनीवर विविध प्रजातींचे वृक्ष वाढत आहेत.
२०१७-१८ मध्ये नागपूर शहरात रेल्वेच्या पडिक जमिनीवर तसेच महसूल विभागाच्या जागेवर सामाजिक वनीकरण विभागाच्या नियमित योजनांच्या माध्यमातून वृक्षलागवड करण्यात आली होती. गोधणी येथील १७ हेक्टर रेल्वेच्या जागेवर १ हजार ४०० वृक्षांची लागवड करण्यात आली होती, तर खापरी येथील रेल्वेच्या ६ हेक्टर जमिनीवर १,३८० वृक्षांची लागवड करण्यात आली होती. यासोबतच, वलनी येथे महसूल विभागाच्या १० हेक्टर जमिनीवर ६,२५० वृक्षांची लागवड करण्यात आली होती. कडुनिंब, बकान, वड, पिंपळ, शिसू, करंज, आवळा, चिंच व करंजपिंपळ या देशी प्रजातींच्या रोपट्यांची निवड यासाठी करण्यात आली होती. गोदनीच्या या क्षेत्रावर आता रोही व अन्य प्राणी आश्रयाला आले आहेत. यासोबतच अनेक पक्षी व प्राणी येथे वाढत आहेत.
शहरातील वाढते तापमान आणि ते रोखण्याची आवश्यकता लक्षात घेऊन या सर्व ठिकाणी पर्यावरणपूरक प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. नागपूर शहरातील वाढते तापमान व प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी या रोपवनाची मोलाची मदत होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज मोहिते व वनरक्षक कैलास सानप यांनी या तीनही रोपवनांच्या संगोपनाची जबाबदारी पार पाडली.
...
सद्यस्थितीत रोपांची सरासरी उंची ५ ते ६ फूट असून जिवंत रोपांची टक्केवारी ८५ ते ९० टक्के आहे. सामाजिक वनीकरणाच्या या उपक्रमामुळे नागपूर शहराच्या आसपास हिरवळ निर्माण झाली असून, पशु-पक्ष्यांना निवारा प्राप्त झाला आहे.
- गीता नन्नावरे, विभागीय वन अधिकारी,
सामाजिक वनीकरण, नागपूर
...