अनिल सोले : वृक्षदिंडीचे नागपुरात स्वागत लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य सरकारने येत्या तीन वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. यावर्षी चार कोटी, पुढच्या वर्षी १३ कोटी व त्याच्या पुढच्या वर्षी ३३ कोटी वृक्ष लागवड करायची आहे. आजघडीला महाराष्ट्रात केवळ २०.४४ टक्के वन शिल्लक आहे. वनाचे क्षेत्र ३३ टक्के पोहोचविण्यासाठी ४०० कोटी वृक्षांची गरज आहे. पर्यावरणाचा ढासळता ऱ्हास थांबवायचा असेल तर वृक्षारोपण व संवर्धनाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी वृक्षारोपण ही चळवळ होणे गरजेचे असल्याचे मत आमदार प्रा. अनिल सोले यांनी व्यक्त केले. २२ जूनपासून अनिल सोले यांच्या नेतृत्वात वृक्षदिंडीला सुरुवात झाली. रविवारी ही दिंडी नागपुरात पोहोचली. नागपूर महापालिकेतर्फे मनपाच्या टाऊन हॉलमध्ये वृक्षदिंडीचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी अनिल सोले बोलत होते. यावेळी आमदार सुधाकर कोहळे, आमदार गिरीश व्यास, जयप्रकाश गुप्ता, बबली मेश्राम, कौस्तुभ चॅटर्जी, नवनीतसिंग तुली, विक्की कुकरेजा आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना सोले म्हणाले की, दीडशे वर्षांपूर्वी इंधनाला पैसे लागत नव्हते. ५० वर्षांपूर्वी पाण्याला पैसे लागत नव्हते. सध्या तरी हवेला पैसे लागत नाही. मात्र येणाऱ्या ३० ते ४० वर्षांत हवेसाठीसुद्धा पैसे खर्च करावे लागणार आहे, प्रत्येकाला हातात आॅक्सिजनचे सिलेंडर बाळगावे लागणार आहे. विकासासाठी झाडे तोडणे आवश्यक आहे. परंतु जेवढी तोडली त्याच्या दुप्पट लावून ती जगविणे याचेही भान असायला हवे. आजघडीला विकासाचा अजेंडा राबविताना पर्यावरणाच्या आधारावर राबविल्यास शाश्वत विकास शक्य होईल. यावेळी बोलताना सुधाकर कोहळे म्हणाले की, सरकार चार कोटी वृक्षांची लागवड करून एक कोटी लोकांना जीवन देण्याचे काम करीत आहे. वृक्षदिंडीच्या स्वागत कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कौस्तुभ चॅटर्जी यांनी पॅरिस करार आणि शाश्वत विकास यावर मार्गदर्शन केले. महापौरांसह पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीकडे वेधले लक्ष वृक्षदिंडी हा कार्यक्रम सरकारचा कार्यक्रम आहे. शासनाचे महत्त्वाचे अभियान असतानाही दिंडीचे स्वागत करण्यासाठी महापालिकेचे महापौर, उपमहापौर व अन्य पदाधिकारी उपस्थित नसल्यामुळे गिरीश व्यास यांनी नाराजी व्यक्त केली. पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती म्हणजे शासनाच्या अभियानाचा अवमानच असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. याबाबत जाब विचारावा असे सुधाकर कोहळे यांना त्यांनी सांगितले.
वृक्षारोपण ही चळवळ व्हावी
By admin | Published: June 26, 2017 1:50 AM