भिवापूर : एरवी वाढदिवस म्हटले की सेलिब्रेशन आलंच! याप्रसंगी कुणी पार्टी करून आनंद उधळतात, तर कुणी एकदिवसीय वृक्षारोपण, फळ वितरणातून सामाजिक दायित्वाचा झेंडा उभा करतात. मात्र भिवापूर येथील एका ४५ वर्षीय शिक्षकाने ४५ वृक्षांची लागवड करून त्यांना जगविण्याचा संकल्प केला आहे. एवढेच नव्हे तर जसे स्वत:चे वय वाढेल तेवढ्याच संख्येत दरवर्षी वृक्ष लागवड करून कर्मभूमी असलेल्या भिवापूर शहराला हिरवा शालू पांघरण्याचा संकल्प या शिक्षकाने केला आहे.
सुरेश राठोड असे या शिक्षकाचे नाव आहे. स्थानिक राष्ट्रीय विद्यालयात अध्यापनाचे कार्य करतात. चित्रकार, नृत्यकार, कवी, लेखक या भूमिकेसह आता वृक्षप्रेमी म्हणून त्यांनी नवी जबाबदारी हाती घेतली आहे. राठोड यांचा ४ जुलै रोजी ४५वा वाढदिवस होता. यानिमित्ताने त्यांनी कार्यरत शाळेत विविध प्रजातींच्या ४५ वृक्षांची लागवड केली. एवढ्यावर न थांबता वृक्षांना नियमित पाणी घालणे, संरक्षण व संवर्धनाची जबाबदारीसुद्धा त्यांनी हाती घेतली आहे. यावेळी संस्थेच्या सचिव लतिफा कुरैशी, मुख्याध्यापक इमरान शेख, फारूख शेख, गजानन मुरकुटे, किशोर राऊत, अंगद शिवरकर, अजय चांदोरे, अझहर कुरेशी, अरविंद टिकले, नितीन वाघमारे, संजय बनकर, लता शेंडे, फुला भागवत, वंदना हुकरे, कीर्ती मेहरकुरे, प्रणीता घुमे, शुभांगी बालपांडे, शोऐब कुरेशी, रेहान कुरेशी, शेषराव चौधरी, नाना दिघोरे आदी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
070721\img-20210704-wa0087.jpg
शाळेच्या परिसरात वृक्षारोपन करतांना शिक्षक सुरेश राठोड यांच्यासह संस्थेच्या सचिव लतिफा कुरैशी व शिक्षक कर्मचारी