ब्रिजेश तिवारी
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : एकीकडे जंगल विरळ हाेत चालले असून, वृक्षाराेपणादरम्यान लावलेली राेपटी जगवण्यावर फारसा भर दिला जात नाही. त्यातच वन विभागाने महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात असलेल्या काटाेल व नरखेड तालुक्यातील जंगलात ‘ड्राेन’द्वारे १ लाख ५० हजार ‘सीड बाॅल’ टाकले. विशेष म्हणजे, या मातीच्या गाेळ्यांमध्ये सर्व देशी झाडांचे बीज आहे. हा राज्यातील पहिलाच पायलट प्राेजेक्ट असून, यशस्वी ठरला आहे.
काेंढाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी फरीद आझमी यांच्याकडे नरखेड वनपरिक्षेत्राचाही प्रभार आहे. त्यामुळे त्यांनी हा प्रयाेग काटाेल व नरखेड तालुक्यातील दाेन्ही राज्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या संरक्षित जंगलात राबविण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी नरखेड उपवन व नरखेड बीटमधील दुर्गम व डोंगराळ भागाची निवड केली. या भागात माणसांद्वारे वृक्षाराेपण करणे शक्य नसल्याने व अधिक खर्चिक असल्याने त्यांनी ‘सीड बाॅल’ व ‘ड्राेन’ यावर लक्ष्य केंद्रित केले.
साेपा वाटणारा हा प्रयाेग तेवढाच कठीण हाेता. मुख्य वनसंरक्षक कल्याणकुमार, उपवन संरक्षक भरतकुमार हाडा, सहायक वन संरक्षक पालवे यांनी या प्रयाेगाला मंजुरी देत त्याची संपूर्ण जबाबदारी वनपरिक्षेत्र अधिकारी फरीद आझमी यांच्याकडे साेपविली. त्यांनी या जंगलात सध्या काेणती झाडे आहेत, याचा अभ्यास व सर्वेक्षण करून ‘सीड बाॅल’मध्ये वापरल्या जाणाऱ्या झाडांच्या बीजाची निवड केली. यासाठी त्यांनी जंगल व त्या भागातील वृक्षांची गरजही लक्षात घेतली. या झाडांचे बीज माेठ्या प्रमाणात गाेळा करून त्याचे चमेली (ता. काटाेल) येथील वन विभागाच्या राेपवाटिकेत ‘सीड बाॅल’ तयार केले. हा राज्यातील पहिलाच पायलट प्राेजेक्ट ठरला आहे.
...
देशी झाडांना प्राधान्य
हा प्रयाेग यशस्वी करण्यासाठी वन विभागाने दाेन्ही राज्याच्या सीमावर्ती भगाातील दुर्गम जंगलाची निवड केली. जंगलात टाकण्यात येणाऱ्या ‘सीड बाॅल’मुळे उगवणारी झाडे ही देशी असावी म्हणून खैर, कडूनिंब, सागवान, आवळा, अमरप्राश, सीताफळ, बिहाडा या झाडांना प्राधान्य देत त्यांचे बीज गाेळा करून त्यांचे ‘सीड बाॅल’ तयार करण्यात आले. या पायलट प्राेजेक्टमुळे काेंढाळी (ता. काटाेल) वनपरिक्षेत्राची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
...
‘सीड बाॅल’ची विशेष काळजी
‘ड्राेन’मधून साेडलेला ‘सीड बाॅल’ जमिनीवर पडताच फुटणार नाही, यासाठी फरीद आझमी यांनी ‘सीड बाॅल’ तयार करण्याच्या पद्धतीची प्रत्यक्ष पाहणी करून अभ्यास केला. त्यासाठी वनविभागाच्या परतवाडा (जिल्हा अमरावती) येथील महाविद्यालयाला भेट दिली. या जंगलात साेडण्यात आलेले ‘सीड बाॅल’ विशिष्ट पद्धतीने तयार केले.
...
१० किलाे वजनाची क्षमता
‘सीड बाॅल’ राेपणासाठी लागणारे ‘ड्राेन’ गुजरातमधून बाेलावण्यात आले. या ‘ड्राेन’ची एकावेळी १० किलाे वजन उचलून ते वाहून नेण्याची क्षमता आहे. या ‘ड्राेन’ने राेज २० हजार ‘सीड बाॅल’ याप्रमाणे १ ते १५ जुलै या काळात १ लाख ५० हजार ‘सीड बाॅल’ वरून जंगलात साेडले. हे सर्व ‘सीड बाॅल’ नरखेड वनपरिक्षेत्रातील ५० हेक्टरमधील दुर्गम भागात वापरण्यात आल्याची माहिती फरीद आझमी यांनी दिली.