लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर-प्लास्टिक पिशव्यांच्या वापरामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावताना अडचणी येत होत्या. तसेच मोकाट जनावरांच्या जीवाला धोका वाढला होता. मात्र प्लास्टिकबंदीचा चांगला परिणाम शहरात दिसायला लागला आहे. कचऱ्यातील प्लास्टिकचे प्रमाण अर्ध्यावर आले आहे. यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावणे सोईचे होत आहे.प्लास्टिकबंदी होण्यापूर्वी शहरातील विविध भागातून दररोज गोळा करण्यात आलेल्या कचऱ्यात ३० ते ३२ टन प्लास्टिक असायचे. मात्र, प्लास्टिकबंदी लागू झाल्यानंतर हे प्रमाण १६ टन इतके कमी झाले आहे. आधीच्या कचऱ्यात नुसत्या प्लास्टिक पिशव्या दिसायच्या. आता प्लास्टिक पिशव्यांचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे साफसफाई करताना कर्मचाऱ्यांना त्रास व्हायचा. आता हा त्रास कमी होत आहे.प्लास्टिक पिशव्या नष्ट होत नसल्याने त्यांचा पर्यावरणावर विपरीत परिणाम व्हायचा तसेच त्या नाल्यांमध्ये अडकून वाहत्या पाण्याला अडथळा निर्माण व्हायचा. त्यामुळे शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदीचा निर्णय घेतला. याबाबत महापालिकेच्या वतीने जनजागृती करण्यात आली. सोबतच शहरात गेल्या आठ महिन्यात ७०० टन प्लास्टिक जप्त करण्यात आले. या सर्व प्रयत्नांचा चांगला परिणाम आता दिसायला लागला आहे. कचऱ्यातील प्लास्टिकचे प्रमाण कमी झाले आहे. भांडेवाडीमध्ये हा कचरा साठवला जात असताना त्यातून प्लास्टिक वेगळे करणे त्रासाचे आहे. आता हा त्रास कमी झाला आहे.प्लास्टिक पिशव्यांमुळे सुुरुवातीला व्यापाऱ्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. आता अनेक दुकानदार कापडी पिशव्या देतात. यातून नवा रोजगार निर्माण झाला आहे.