सुमेध वाघमारे
नागपूर : उपराजधानीवर डेंग्यूचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. जून ते १४ ऑगस्ट या अडीच महिन्यातच ४३० रुग्णांची नोंद झाली आहे, तर डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या हजाराच्या घरात गेली आहे. या दोन्ही रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱ्या प्लेटलेट्सच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्यात दिवसाला १५० वर मागणी होत असताना, १०० प्लेटलेट्सच्या बॅग उपलब्ध करून देणेही रक्तपेढ्यांना कठीण जात आहे. परिणामी, डेंग्यू रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.
डेंग्यूच्या डासासाठी पावसाची उघडीप पोषक ठरत आहे. डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडे प्रभावी यंत्रणा नाही. शिवाय, कठोर पावले उचलली जात नसल्याने घरच्याघरी या डासांच्या उत्त्पत्तीचे केंद्र ठरले आहे. परिणामी, जानेवारी ते १४ ऑगस्टपर्यंत ४४२ रुग्णांची नोंद झाली आहे. धक्कादायक म्हणजे, मागील १४ दिवसातच ९८ रुग्ण म्हणजे रोज नव्या सात रुग्णांची भर पडत आहे. एकीकडे डेंग्यू वाढत असताना डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णातही वाढ झाली आहे. या वाढीचा ताण प्लेटलेट्स पुरविणाऱ्या रक्तपेढ्यांवर पडला आहे. आधीच कोरोनामुळे रक्ताची टंचाई असताना प्लेटलेट्स उपलब्ध करून देणे त्यांना अडचणीचे जात आहे.
-‘सिंगल डोनर प्लेटलेट्स’च्या मागणीत दुपटीने वाढ
शरीरात प्लेटलेट्सची संख्या कमी होण्याच्या स्थितीला ‘थ्रोम्बोसायटोपोनिया’ असे म्हणतात. जेव्हा ‘प्लेटलेट्स काऊंट १५० हजार प्रतिमायक्रोलिटरपेक्षा खाली येतात तेव्हा त्याला ‘लो प्लेटलेट्स’ मानले जाते. अशावेळी रुग्णाला ‘रँडम डोनर प्लेटलेट्स’ (आरडीपी) म्हणजे अनेक रक्तदात्यांच्या रक्तातून एकत्र केलेल्या प्लेटलेट्स दिल्या जातात. परंतु काही रुग्णांमध्ये या प्लेटलेट्समधून आवश्यक संख्या वाढत नाही. यामुळे त्यांना ‘सिंगल डोनर प्लेटलेट्स’ (एसडीपी) म्हणजे एकाच रक्तदात्याच्या रक्तातून दिलेले प्लेटलेट्स दिले जाते. सध्या या प्लेटलेट्सच्या मागणीतही दुपटीने वाढ झाल्याचे रक्तपेढींचे म्हणणे आहे.
-शासकीयमध्ये रोज १५ ते २० ची मागणी, पुरविले जात आहे ५ ते ७ प्लेटलेट्स
डागा या शासकीय रक्तपेढीत रक्तातून प्लेटलेट स्वतंत्र काढण्याची यंत्रणा नाही. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना प्लेटलेटसाठी मेयो, मेडिकल किंवा खासगी रक्तपेढ्यांकडे धाव घ्यावी लागत आहे. खासगीमध्ये याची किंमत गरीब रुग्णांना परवडणारी नसल्याने मेयो, मेडिकलवरच अनेकांची भिस्त आहे. एकट्या मेडिकलच्या रक्तपेढीत रोज १५ ते २० प्लेटलेट्सची मागणी असताना तुटवड्यामुळे ५ ते ७ प्लेटलेट्सच्या बॅग पुरविणेही कठीण झाले आहे. मेयोतही अशीच स्थिती आहे.
- रोज ३० ते ४० वर प्लेटलेट्सचा पुरवठा
पूर्वी महिन्याला ३० ते ४० ‘एसडीपी’ प्लेटलेट्स बॅगची मागणी होती, आता ती दिवसावर आली. त्यातुलनेत रक्तदान कमी होत असल्याने त्या उपलब्ध करून देणे कठीण जात आहे. मागील आठवड्यात एकाच दिवशी १६० ‘एसडीपी’, व ‘आरडीपी’ची मागणी झाली. मागील २० वर्षांतील ही सर्वात मोठी मागणी होती. प्लेटलेट्सच्या मागणीत झालेली वाढ पाहता रक्तदात्यांनी स्वेच्छेने पुढे येऊन रक्तदान करणे गरजेचे झाले आहे.
- डॉ. हरीश वरभे, संचालक लाईफ लाईन रक्तपेढी
- मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी
डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स कमी होणे हे स्वाभाविक असते. परंतु लगेचच प्लेटलेट्स द्यायची मुळीच गरज नसते. कमी झालेल्या प्लेटलेट्सने काही समस्या येत नाही. जर प्लेटलेट्स २० हजाराच्या खाली गेले तरच आपल्याला प्लेटलेट्स देण्याचा विचार करायला हवा. परंतु अलीकडे ‘रिस्क’ नको व नातेवाईकांच्या मागणीवरून प्लेटलेट्स दिल्या जात आहे. परंतु रक्तदानाची संख्या कमी झाल्याने त्या उपलब्ध करून देणे अडचणीचे जात आहे.
- डॉ. संजय पराते, प्रमुख रक्तपेढी